बिलोली, गोविंद मुंडकर| सेवा सहकारी सोसायटी बिलोली येथील चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले. ही प्रक्रिया नियमबाह्य व दिशाभूल करणारी असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र या सर्व आक्षेपांनंतरही मागील तारखेतील ठराव दाखवत अध्यक्षपदी प्रसिद्ध व्यापारी विठ्ठलराव रायकंठवार यांची निवड करण्यात आली आहे. सेवा सहकारी सोसायटी यातील गैर प्रकाराचे पडसाद हाऊसिंग सोसायटीच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर पडले. संचालक गंगाधर कल्याणकर यांच्या ठोस मांडणीमुळे हाउसिंग सोसायटीची अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया थांबवण्यात आली.

मंगळवार, दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी दुपारी बारा वाजता झालेल्या बैठकीत विद्यमान उपाध्यक्ष यादराव तुडमे यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. तांत्रिक कारणांमुळे उपाध्यक्ष पदाची निवड मात्र स्थगित करण्यात आली आहे.

या बैठकीसाठी सचिवांकडून पाठवण्यात आलेले पत्र नियमबाह्य असल्याचा आरोप संचालकांनी केला होता. विशेष म्हणजे संस्थेचे माजी चेअरमन — जे विधान परिषद व विधानसभेचे सदस्यही राहिले होते — यांच्या निधनानंतर एकही अधिकृत बैठक अथवा श्रद्धांजली सभा न झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती.


निवड प्रक्रियेवर आक्षेप घेतल्यानंतर मागील तारखेला प्रोसिडिंग तयार करून संचालकांची संमती घेण्यात आल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. अध्यक्षपदासाठी विठ्ठलराव रायकंठवार हे सर्वसंमतीचे उमेदवार असल्याने अखेर सर्व संचालकांनी या प्रक्रियेस मान्यता दिली.

दरम्यान, उपाध्यक्षांनी कार्यकारी मंडळाकडे अधिकृत राजीनामा न देता निवड प्रक्रिया कशी राबवली जात आहे, असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. तसेच बेकायदेशीर प्रक्रिया असूनही सहकार विभाग दुर्लक्ष का करत आहे, असा थेट प्रश्नही संचालकांनी उपस्थित केला होता व संबंधितांविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली होती.

अखेर विठ्ठलराव रायकंठवार यांच्या पुढाकारामुळे सर्वांनी संमती दर्शवत अध्यक्षपदाची निवड पूर्ण करण्यात आली. तांत्रिक दोष लक्षात घेता उपाध्यक्ष पदाची निवड पुढील बैठकीपर्यंत स्थगित ठेवण्यात आली. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता हाउसिंग सोसायटीच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी तारीख निश्चित करण्यात आली होती. सोसायटी निवड प्रक्रियेतील दोष याबाबत झालेला गैरप्रकार हाउसिंग सोसायटीचे संचालक गंगाधर कल्याणकर यांनी आणून दिला. हाऊसिंग सोसायटीची निवड प्रक्रिया सुद्धा चुकीच्या पद्धतीने होत आहे आणि तसे करता येणार नाही अशी ठोस भूमिका घेतल्यामुळे हाउसिंग सोसायटीच्या अध्यक्षपदाची निवड न करता बैठक रद्द करण्यात आली.

