HomeनांदेडDigital preservation : महाभूसंपादन पोर्टलवरील 'LADAR' प्रणालीमुळे भूसंपादन अभिलेखांचे डिजिटल संरक्षण

Digital preservation : महाभूसंपादन पोर्टलवरील ‘LADAR’ प्रणालीमुळे भूसंपादन अभिलेखांचे डिजिटल संरक्षण

नांदेड | भूसंपादन प्रक्रियेनंतर महत्त्वाच्या अभिलेखांचे सुरक्षित जतन आणि सातबारा नोंदी वेळेत अद्ययावत करण्यासाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाने महाभूसंपादन पोर्टलवर ‘भूसंपादन डिजिटल अभिलेख कक्ष’ (LADAR – Land Acquisition Digital Archive Room) ही अभिनव डिजिटल प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीमुळे भूसंपादित जमिनींच्या नोंदींचे डिजिटल संरक्षण, पारदर्शक व्यवस्थापन आणि शासकीय कामकाजाला गती मिळाली आहे.

राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे, जलसंधारण तसेच इतर विकास प्रकल्पांसाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींचे निवाडे, अधिसूचना, मोबदला वाटप प्रमाणपत्रे आणि इतर महत्त्वाचे दस्तऐवज यापूर्वी सुरक्षित ठेवणे मोठे आव्हान होते. ‘LADAR’ प्रणालीमुळे हे सर्व अभिलेख डिजिटल स्वरूपात जतन करून संबंधित शासकीय विभागांना सहज उपलब्ध होत आहेत.

या प्रणालीद्वारे आतापर्यंत १२ हजारांहून अधिक सातबारा उताऱ्यांवरील नोंदी अद्ययावत करण्यात आल्या आहेत. तसेच ६०० हून अधिक कमी-जास्त पत्रके, १९ हजारांहून अधिक मोबदला वाटप प्रमाणपत्रे, २,३०० हून अधिक निवाडे आणि वाढीव मोबदल्याची ५ हजारांहून अधिक प्रकरणे डिजिटायझेशन करण्यात आली आहेत.

यामुळे भूसंपादित जमिनींची दुबार खरेदी-विक्री रोखणे, कायदेशीर वाद टाळणे, नागरिकांची फसवणूक रोखणे आणि संबंधित शासकीय विभागांच्या नावावर सातबारा नोंदी तातडीने अद्ययावत करणे शक्य झाले आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले की, भविष्यात नागरिकांना आवश्यक असलेले भूसंपादन अभिलेख ऑनलाइन उपलब्ध होणार असून त्यामुळे त्यांचा वेळ आणि त्रास दोन्ही कमी होईल. विविध शासकीय यंत्रणांनाही अद्ययावत सातबारा उतारे सहज उपलब्ध होतील.

उपजिल्हाधिकारी (भूसंपादन समन्वय) प्रियांका पवार-कर्डिले यांनी सांगितले की, सन २०१३ ते २०२६ या कालावधीतील नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे, जलसंधारण व इतर विभागांच्या ९६१ निवाड्यांची माहिती आणि विवरणपत्र ‘ई’ ऑनलाइन पाहण्यासाठी व डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. यापूर्वीचे निवाडे आणि अधिसूचनाही टप्प्याटप्प्याने पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ही प्रणाली विभागीय आयुक्त जी. श्रीकांत आणि जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आली असून, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री अतुल सावे यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आहे.

ठळक बाबी
१२ हजारांहून अधिक सातबारा नोंदी अद्ययावत
१९ हजारांहून अधिक मोबदला वाटप प्रमाणपत्रांचे डिजिटायझेशन
२,३०० हून अधिक निवाडे डिजिटल स्वरूपात उपलब्ध
९६१ भूसंपादन निवाडे ऑनलाइन पाहण्याची व डाउनलोडची सुविधा
दुबार खरेदी-विक्री आणि कायदेशीर वादांना आळा
नागरिकांसाठी अधिक पारदर्शक व सुलभ डिजिटल सेवा

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments