Homeनांदेडसहा महिन्यांचे मानधन थकले; शालेय पोषण आहार कामगारांचा संताप! गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला ठोकले...

सहा महिन्यांचे मानधन थकले; शालेय पोषण आहार कामगारांचा संताप! गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला ठोकले कुलूप

दोन-चार दिवसांत मानधन न मिळाल्यास ‘रुमणे मोर्चा’ काढण्याचा इशारा

हिमायतनगर (वाढोणा), अनिल मादसवार| दुष्काळाच्या झळा, हाताला काम करूनही पदरात न पडणारे मानधन आणि तोंडावर आलेली दिवाळी… अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शालेय पोषण आहार कामगारांचा संयम अखेर सुटला आहे. मागील सहा महिन्यांपासून मानधन थकल्याने संतप्त झालेल्या कामगारांनी कॉम्रेड दिगंबर काळे आणि वामनराव पाटील वडगावकर यांच्या नेतृत्वाखाली गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला कुलूप ठोकून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.

शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार पुरविण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या या कामगारांना सहा महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. एकीकडे महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे, तर दुसरीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील आर्थिक गणित कोलमडले आहे. अशा परिस्थितीत काम करूनही मोबदला मिळत नसल्याने कामगारांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपल्याची व्यथा आंदोलनकर्त्यांनी मांडली.

दिवाळी तोंडावर, पण कामगारांच्या घरात अंधार! दसरा नुकताच पार पडला असून दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्वसामान्य कुटुंबे सणाच्या तयारीत असताना शालेय पोषण आहार कामगारांच्या घरात मात्र आर्थिक संकटाचे सावट आहे. सहा महिन्यांचे मानधनच मिळाले नसल्याने मुलांचे कपडे, फराळ, घरखर्च आणि सणाच्या आवश्यक वस्तूंची खरेदी करायची तरी कशी, असा प्रश्न कामगारांसमोर उभा ठाकला आहे. ‘विद्यार्थ्यांना पोषण आहार देणाऱ्या कामगारांच्या घरातच उपासमारीची वेळ; मग त्यांची दिवाळी गोड कशी होणार?’ असा सवाल या आंदोलनाच्या निमित्ताने उपस्थित होत आहे.

दोन-चार दिवसांची मुदत; अन्यथा रुमणे मोर्चा! थकीत मानधनाचा प्रश्न येत्या दोन ते चार दिवसांत मार्गी लावून कामगारांच्या खात्यात पैसे जमा करावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे. निर्धारित मुदतीत मानधन न मिळाल्यास गटशिक्षणाधिकारी कार्यालयावर ‘रुमणे मोर्चा’ काढण्यात येईल, असा इशाराही कॉम्रेड दिगंबर काळे आणि वामनराव पाटील वडगावकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

IMG20261021123439 scaled सहा महिन्यांचे मानधन थकले; शालेय पोषण आहार कामगारांचा संताप! गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला ठोकले कुलूप
oplus_0

या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला व पुरुष कामगार सहभागी झाले होते. मानधनाच्या प्रतीक्षेत असलेल्या कामगारांचा उदरनिर्वाह आणि सणासुदीचा खर्च भागविण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, आता तरी शिक्षण विभागाने या मागणीची दखल घेऊन तातडीने मानधन अदा करावे, अशी मागणी होत आहे.

IMG20261021124155 scaled सहा महिन्यांचे मानधन थकले; शालेय पोषण आहार कामगारांचा संताप! गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला ठोकले कुलूप
oplus_0

सहा महिने काम करूनही मानधन मिळत नसेल, तर या कामगारांनी कुटुंबाचा संसार चालवायचा तरी कसा? प्रशासनाने दिवाळीपूर्वी मानधन देऊन या कष्टकरी कामगारांना दिलासा देणार की त्यांना पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments