हिमायतनगर (वाढोणा), अनिल मादसवार| हिमायतनगर (वाढोणा) येथे शिव प्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीने आयोजित दुर्गामाता दौडीचा विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर भव्य शोभायात्रेने उत्साहात समारोप करण्यात आला. या शोभायात्रेत चिमुकल्या बालकांनी दुर्गामाता, राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा परिधान करून सहभाग नोंदविला. त्यांच्या आकर्षक वेशभूषेने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.


घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत सुरू असलेल्या दुर्गामाता दौडीच्या समारोपानिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. भव्य शोभायात्रेतून धार्मिक श्रद्धा, हिंदवी स्वराज्याचा इतिहास आणि महापुरुषांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश देण्यात आला.



दरम्यान, बजरंग चौक परिसरात शोभायात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली, तर शोभायात्रेवर पुष्पवृष्टी करून सहभागींचे स्वागत करण्यात आले. जय भवानी, जय शिवाजी आणि जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.




विजयादशमीच्या मंगलमय पर्वावर पार पडलेल्या या दुर्गामाता दौड समारोप सोहळ्यामुळे शहरातील धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण अधिक उत्साहपूर्ण झाले. चिमुकल्यांच्या ऐतिहासिक वेशभूषेने आणि बजरंग चौकातील भव्य स्वागताने या शोभायात्रेची विशेष रंगत वाढविली.

