देगलूर (गंगाधर मठवाले) देगलूर तालुक्यातील तमलूर येथे विद्युत शॉर्टसर्किटमुळे शेतकरी तुळशीदास रामराव देवकते यांच्या शेतातील चार एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली. ऊसतोडणीला काही दिवस शिल्लक असताना ही दुर्घटना घडल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, वर्षभर मेहनत करून उभे केलेले पीक डोळ्यांदेखत जळताना पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.


यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांसमोर आधीच पाणीटंचाई आणि पिकांच्या नुकसानीचे संकट उभे आहे. अनेक ठिकाणी शेतातील तण व पिके वाळून गेली आहेत. अशा परिस्थितीत विद्युत तारांमधील शॉर्टसर्किटमुळे आग लागल्यास कोरड्या गवतामुळे ती वेगाने पसरून मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. तमलूर येथील घटनेमुळे या धोक्याची पुन्हा जाणीव झाली आहे.



