नांदेड/नायगांव l आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते श्री विनायक पाटील शिंदे मांजरमकर यांनी देशाचे माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस (एस पी) पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आ. जयंत पाटील, राज्याचे माजी मंत्री आ. राजेश टोपे यांची मुंबई येथील पक्ष कार्यालयात नुकतीच भेट घेऊन नायगांव विधानसभा मतदार संघातून पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आणि पक्ष श्रेष्ठींकडे निवडणुक उमेदवारींसाठी अर्ज सादर केला .
नायगाव तालुक्यातील कुंटूर सर्कलचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा हुस्सा येथील रहिवासी विनायक पाटील शिंदे मांजरमकर यांनी नायगाव तालुक्यातून २००७ मध्ये कॉंग्रेस कडून जि.प.लढवली तसेच २००५ ते २०१० या कालावधीत नायगाव तालुका सरपंच संघटना अध्यक्ष म्हणून कार्यरत होते व एक संस्था चालक हुस्सा गावचे माजी सरपंच असणारे विनायक शिंदे यांनी नायगाव तालुक्यात व विविध कार्यक्रमात अग्रेसर राहून काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस सोबत पक्षनिष्ठे ने काम केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुरोगामी विचारसरणीचा कायम पगडा त्यांच्या राजकीय वाटचालीवर राहीलेला असल्यामुळे पक्षाने निष्ठावंताना संधी दिल्यास आपण पूर्ण ताकदीनिशी नायगांव विधानसभा लढवू असे त्यांनी प्रतिक्रिया देतांना सांगितले.