नांदेड| तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रास तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची मागणी अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरु संघनायक भदंत पय्याबोधी थेरो यांनी केली. त्यांच्यावतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी डॉ. भदंत उपगुप्त महाथेरो, भदंत करूणानंद, भदंत महविरो भदंत पंय्यानंद, भदंत धम्मशिल, भदंत धम्मधर, भदंत हर्षबोधी, भदंत शांतिरत्न, भदंत मोग्गलायन, भदंत मुदितानंद, भदंत पंय्यारत्न आदींची उपस्थिती होती.



तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे सर्वेसर्वा भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबई येथे जाऊन निवेदन देण्यात आले. या निवेदनात खुरगाव श्रामणेर प्रशिक्षण केंद्रासमोरील गायरान जमीन ही श्रामनेर शिबिरासाठी विपश्यना शिबिरांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी समाज उपयोगासाठी देण्यात यावी यासह श्रामणेर प्रशिक्षण केंद्राला तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा या मागणीचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले असल्याची माहिती भंदत पंय्याबोधी थेरो यांनी दिली.



श्रामणेर प्रशिक्षण केंद्र येथे व्यसनमुक्ती प्रकल्प, श्रामणेर दीक्षा, प्रशिक्षण शिबीर, रक्तदान शिबिर, भोजनदान, प्रबोधन व जनजागृती विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. वृक्षारोपण, वनसंवर्धन असे पर्यावरण संरक्षणाचे अभियान भिकू संघाच्या वतीने राबवले जातात. दररोज शेकडो उपासक उपासिका भेट देतात. या ठिकाणावर वर्षभरात कोणत्याही दिवशी दीक्षा घेता येते. या ठिकाणी अखंड पाषाणात कोरलेली बुद्धाची मूर्ती आहे. तसेच याच परिसरात श्रामणेर दीक्षा संकल्प भूमीचे भव्य बांधकाम सुरू आहे. दरमहा पौर्णिमेचे औचित्य साधून पौर्णिमोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे हजारो श्रद्धावान उपासक उपासिकांचा ओघ वाढत आहे. या पार्श्वभूमीवर या परिसराच्या विकासासाठी तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त होण्याची गरज आहे.




