हिमायनगर, अनिल मादसवार| आता आपल्या महाराष्ट्रात गोहत्या बंद होणार आणि जे जे लोकं असं बेकायदेशीर कृत्य करतील त्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल. असे प्रतिपादन गोसेवा आयोग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शेखरजी मुंदडा यांनी व्यक्त केले. ते हिमायतनगर तालुक्यातील मौजे पवना येथील देवकृपा गोशाळा तथा गोविज्ञान केंद्र भुमीपुजन सोहळा प्रसंगी बोलत होते.
मान्यवरांच्या हस्ते शुक्रवार दि 04 ऑक्टोबर 2024 रोजी यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाला. या भूमिपूजनानंतर बोलताना शेखरजी मुंदडा म्हणाले कि, राज्यातील 1065 गोशाळाना लवकरच प्रती गोवंश प्रती दिवस 50/- रूपये प्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. यामुळे गोशाळा लवकरच स्वयंपुर्ण होतील. यानंतर गोशाळांच्या आर्थिक बळकटीसाठी गोमय मुल्य वर्धन योजना आणुन गोमय व गोमुत्राव्दारे गोशाळांना आर्थिक उत्पन्न मिळवुन दिले जाईल. गोसेवा आयोग किरण बिच्चेवार आणि त्यांच्या गोरक्षकांच्या कार्यात नेहमीच सहभागी होता आणि भविष्यात देखील राहील. किरण बिच्चेवार यांचा अत्याधुनिक शेड बघण्यासाठी मी पुन्हा येणार आहे असे मत देखील यावेळी त्यांनी व्यक्त केले.
आम्ही किरण बिच्चेवार पाठीशी उभे आहोत- भाऊराव कुदळे, क्षेत्र गोरक्षा प्रमुख, विश्व हिंदु परिषद मुंबई क्षेत्र
अतिशय प्रतीकुल परीस्थितीचा सामना करत शेकडो केसेस करून कसायांना जेरीला आणणाऱ्या बिच्चेवार यांना प्रशासनाने त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. पण त्या त्या अधिकाऱ्यांना संघटनेच्या ताकदीचा परीणाम भोगावा लागला. यांचे गोरक्षणाचे कार्य अतिशय पारदर्शकपणे ते सर्व शेकडो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन करतात. परीणाम नांदेड जिल्ह्यात मागील 14 महीन्यात 248 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, एवढे गुन्हे महाराष्ट्रात ईतर कोणत्याही जिल्ह्यात नोंद झालेले नाहीत. कार्यकर्त्यांना सांभाळुन ठेवणे, त्यांच्या अडीअडचणीत मदत करणे हे किरण बिच्चेवारचे कौशल्य आहे, त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. आम्ही कोणी प्रत्यक्ष दिसलो नाही तरीही किरण बिच्चेवार यांच्या सोबतच आहोत असे ठणकावून सांगितले.
यावेळी उद्घाटक म्हणून डॉ सुनीलजी सुर्यवंशी सदस्य गोसेवा आयोग, अशोक जैन, अध्यक्ष प्राणी कल्याण कायदा संनियंत्रण समिती महाराष्ट्र राज्य, राजुभाई शहा, ट्रस्टी, वर्धमान संस्कार धाम मुंबई, प्रताप देशमुख, माजी बांधकाम सभापती जि.प. नांदेड, अनिरुद्धजी केंद्रे, विशेष संपर्क प्रमुख, विश्व हिंदु परिषद देवगीरी प्रांत, महाविरसेठ श्रीश्रीमाळ, उपाध्यक्ष, श्री परमेश्वर मंदीर ट्रस्ट वाढोणा, शामजी रायेवार, धर्मप्रसार सह प्रमुख, विश्व हिंदु परिषद देवगीरी प्रांत, रामचंद्र पाटील, सुभाषराव बलपेलवाड, आशीष सकवान, विलास वानखेडे आदीसह अनेकांची उपस्थिती होती.
यावेळी देवकृपा गोशाळा तथा गोविज्ञान केंद्र, पवना चे संचालक, किरण बिच्चेवार म्हणाले कि, आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मिळुन नांदेड जिल्ह्यात गोहत्येविरूध्द एक अभियान सुरू केले होते. निस्वार्थ कार्यकर्त्यांच्या परीश्रमाने एकट्या नांदेड जिल्ह्यात ऐतिहासिक गोरक्षणाचे कार्य झालेले आपल्याला दिसत आहे. याचे सर्व श्रेय विश्व हिंदु परिषदेला जाते, विपरीत परिस्थितीत संघटना आमच्या पाठीशी खंबीरपणे ऊभी राहते म्हणुन आम्ही यशश्वीपणे कसायांना तोंड देऊ शकत आहोत. हे जोखीमीचे काम करत असताना कळत नकळत ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केली त्या सर्वांचे त्यांनी आभार मानले.