नांदेड| आगामी नांदेड लोकसभा पोटनिवडणुक व महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून, सर्वच पक्षाकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. दरम्यान निवडणुकीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवारांकडून आपल्या प्रसिद्धीपत्रक, बॅनरमध्ये मित्रपक्षांच्या दिवंगत व कार्यरत नेत्यांचा सोयीनुसार वापर करित असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह निष्ठावंंत कार्यकर्त्यातून नाराजीसह संतप्त प्रतिक्रिया ऐकावयास मिळत आहेत.
महाविकास आघाडी प्रणित भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नांदेड लोकसभा मतदार संघातील खा.वसंतराव चव्हाण यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेसाठी त्यांचे सुपुत्र प्रा.रविंद्र चव्हाण यांना काॅग्रेसकडून उमेदवार मिळाली असून, पोटनिवडणूकीसह या लोकसभा मतदारसंघात असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघासाठी काॅग्रेसनेच उमेदवार दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पक्षाचा एकही उमेदवार नाही. नांदेड उत्तर मतदारसंघात काॅग्रेससह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाही उमेदवार आहे. या मतदारसंघात दोन्ही पक्षांच्या उमेदवारीचा तिढा सद्यातरी कायमच असला तरिही महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते प्रचारात एकत्रित उतरले आहेत. मात्र काॅग्रेसकडून त्यांचा सन्मान राखला जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
आपल्या उमेदवारांच्या प्रसिद्धीपत्रक,बॅनरवर काॅग्रेसकडून सहकारी मित्रपक्षांच्या स्थानिक दिवंगत व कार्यरत नेत्यांसह त्यांच्या छायाचित्रांचा केवळ सोयीनुसार वापर केला जात असल्याचे स्पष्ट दिसून येत असून, त्याची सुरुवातच दिवंगत खा.वसंतराव चव्हाण यांच्याच भूमितून नायगांवात त्यांच्या पश्चात त्यांच्याच वारसदारांनी केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याचे बोलल्या जात आहे. प्रा.चव्हाण तसेच,भाजपातून काॅग्रेसमध्ये घरवापसी केलेल्या माजी मंत्री भास्करराव पाटील खतगांवकर यांच्या स्नुषा सौ.मीनल खतगांवकर ह्या नायगांव विधानसभा मतदारसंघातून काॅग्रेसच्या उमेदवार असल्याने त्यांच्याही प्रचारार्थ नरसी येथे मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीचे आयोजन काही दिवसापूर्वी करण्यात आलेले होते.
सदरील बैठकीचा बोलविता धनी दूसराच असतांनाही कार्यक्षेत्रातील तालुकाध्यक्षांच्या सूचनेवरुन असल्याचे भासविण्यात आले होते. मात्र या बैठकीसाठीच्या प्रसिद्धीपत्रक,बॅनरमधून मुख्यत्वेकरून या मतदारसंघात आपल्या स्वाभिमानी व प्रेरणादायी कार्याचा ठसा निर्माण केलेले पक्षाचे दिवंगत नेते, माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्यासह त्यांचे सुपुत्र शिरीष व कैलास गोरठेकर तसेच,पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगांवकर यांचेही छायाचित्र वापरण्यात आले नव्हते. याबाबतची थेट तक्रार पक्ष स्थापनेपासून पक्षात कार्यरत असलेल्या एका निष्ठावंतांने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील व स्थानिक वरिष्ठांना केली होती. त्यानंतर,पक्षाच्या निष्ठावंतासह प्रमुख पदाधिकारी यांनी या बैठकीकडे पाठ फिरवून जणू घरचाच आहेर दिल्यानंतरही प्रा.चव्हाण यांच्यासह विधानसभा मतदार संघनिहाय काॅग्रेसच्या उमेदवारांसह त्यांच्या सल्लागारांनी स्वतःत बदल केलाच नसल्याची बाब पून्हा प्रकर्षाने जाणवते आहे.
काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले आज दि.७ नोव्हेंबर रोजी काॅग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ जिल्ह्यात असून भोकर, मुखेड, बिलोली-देगलूर,नांदेड दक्षिण व उत्तर विधानसभा मतदारसंघात त्यांच्या उपस्थितीत सभांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सर्वदूर चर्चित असलेल्या भोकर मतदार संघातील मुदखेड येथे आयोजित सभेच्या काही प्रसिद्धीपत्रक,बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्या दिवंगत व कार्यरत नेत्यांची पहिल्यांदाच वापर केलेली छायाचित्र ठळकपणे दिसून आली. दिवंगत माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर व त्यांचे सुपुत्र शिरिष गोरठेकर यांचे काही ठिकाणी छायाचित्र वापरण्यात आले तर,काही ठिकाणी ते नसल्याचेही बाब दिसून आली आहे.
नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील काॅग्रेसचे उमेदवार व विद्यमान आमदार मोहन हंबर्डे यांचेच नावं असलेल्या त्यांचे प्रसिद्धीपत्रक, बॅनरवर शिवसेना दिवंगत आ.प्रकाशभाऊ खेडकर यांचे छायाचित्र वापरले असून, भाजपातून काॅग्रेसमध्ये घरवापसी केलेल्यांना प्राधान्याने स्थान देतांना सहकारी मित्रपक्षांच्या सर्वच स्थानिक नेत्यांना त्यांनी डावलले आहे. याच सभेसाठी नांदेड लोकसभा पोटनिवडणूकीचे काँग्रेस उमेदवार रविंद्र वसंतराव चव्हाण तसेच,विधानसभेचे उमेदवार मोहन हंबर्डे या दोघांचेही नामोल्लेख असलेल्या प्रसिद्धीपत्रक, बॅनरमध्ये शिवसेनेचे दिवंगत आ.प्रकाशभाऊ खेडकर यांचे छायाचित्र वापरण्यात आले नाही. परंतू, मित्रपक्षांच्या स्थानिक नेत्यांची छायाचित्र वापरण्यात आलेली आहेत.
मुखेड विधानसभा मतदारसंघांचे काँग्रेस उमेदवार व माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी मात्र मित्रपक्षांच्या सर्वच स्थानिक नेत्यांना प्राधान्य दिल्याचा आव आणतांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भगवानराव आलेगांवकर यांचे छायाचित्र वगळून याच पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील कदम यांना प्राधान्य दिले असून महत्वाची बाब बेटमोगरेकर हे काॅग्रेसचे विद्यमान ग्रामीण जिल्हाध्यक्ष असतांनाही त्यांनी सहकारी मित्रपक्षांच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची प्रतारणा केल्याचे यावरुन स्पष्ट होते.तर,त्याच पक्षाचे बिलोली- देगलूरमधील उमेदवार निवृत्ती कांबळे यांनी सर्वांनाच प्राधान्य दिल्याचे दिसून आलेले आहे.
नांदेड उत्तरचे काँग्रेस उमेदवार व माजी महापौर अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भगवानराव आलेगांवकर यांच्या छायाचित्राला प्राध्यान्य दिले परंतू,या मतदारसंघात कार्यक्षेत्रात असलेले याच पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील कदम यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्कप्रमुख दत्ता कोकाटे,जिल्हाप्रमुख माधव पावडे आदींचे छायाचित्रच आपल्या प्रसिद्धीपत्रक,बॅनरवर वापरले नसल्याची गंभीर बाब सामोरे आली आहे. महत्वाचे म्हणजे, उपरोक्त तिन्ही मित्रपक्षांचे नेते याच मतदारसंघातून उमेदवारीसाठी स्वपक्षाकडे आग्रही होते. त्यांच्याऐवजी जात फॅक्टरच्या माध्यमातून महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळविलेले सत्तार हे काॅग्रेसचे विद्यमान शहर जिल्हाध्यक्ष असतांनाही त्यांनी केलेली चूक अनेकांना खटकते आहे.
महाविकास आघाडीकडून काॅग्रेसपक्षानेच लोकसभा पोटनिवडणूकीसह कार्यक्षेत्रातील सहाही विधानसभा मतदारसंघात दिलेल्या उमेदवारांनी आपल्या प्रचारार्थ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांच्या पहिल्याच दौर्यातील सभांच्या प्रसिद्धीपत्रक,बॅनरमधून मित्रपक्षांच्या दिवंगत नेत्यांची छायाचित्रे विधानसभा मतदारसंघ मर्यादीत ठेवली तर, काॅगेसमध्ये घरवापसी केलेल्या आयाराम- गयाराम नेत्यांच्या छायाचित्रांना प्रथम प्राधान्य दिले असले तरिही स्व. आणि मित्रपक्षांच्या स्थानिक जेष्ठ नेत्यांसह शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्षांना दुय्यम स्थान दिल्याचेही तर,अनेक विधानसभा मतदारसंघ व तालुक्यांचे अध्यक्ष,सभा परिसरात प्राबल्य असलेली नेतेमंडळींना प्रसिद्धीपासून दूरच ठेवल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. दरम्यान याबाबत काॅग्रेस व मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांत संतप्त चर्चा झडत असल्याने त्यांना आपलेसे करण्यासाठी विरोधक आलेल्या संधीचे सोने करण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजते.
वादळापूर्विची शांतता !
महत्वाची बाब म्हणजे,रविंद्र वसंतराव चव्हाण यांच्यासह विधानसभानिहाय काॅग्रेस उमेदवारांच्या कार्यपद्धतीवर काॅग्रेस व मित्रपक्षांचे अनेकजण नाराजी व्यक्त करित आहेत. आघाडीचा धर्म म्हणून उसने आवसान आणून स्थानिक वरिष्ठ पदाधिकारी गप्पगार असले तरिही निष्ठावंत कार्यकर्ते मात्र मनोमनी संतप्तपणे खदखद व्यक्त करित असल्याने हि वादळापूर्विची शांतता असल्याची प्रतिक्रिया काहींनी बोलून दाखविली.
महिला, युवकांसह अन्य आघाड्या नामधारी ?
विशेष बाब म्हणजे, सर्व समाजघटकांना सोबत घेऊन वाटचाल करित धर्मनिरपेक्ष राजकारण,महिला व युवकांना प्राधान्य असे प्रत्येकवेळी बोलून दाखविणाऱ्या काॅग्रेसच्या येथिल सर्वच उमेदवारांसह स्थानिक नेत्यांनी मात्र आपल्या व मित्रपक्षांच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांसह महिला, यूवक,सामाजिक न्याय,कामगार आदी प्रत्येक आघाड्यांचे पदाधिकारी जणू नामधारीच बनविले असून त्यांचा आपल्या प्रचारासाठी पूरेपूर फायदा करुन घेतांना त्यांना प्रसिद्धीपासून दूर ठेवून आपल्या प्रसिद्धीपत्रक, बॅनरमध्ये एकाच्याही छायाचित्राचा वापर केलाच नसल्याचे आढळून आले आहे.