Wednesday, May 13

Shivaji Vidyalaya ; शिवाजी विद्यालयात संविधान जागर महाव्याख्यानमाला संपन्न

नवीन नांदेड l जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी संचलित शिवाजी विद्यालय सिडको नांदेड या शाळेत युवा प्रबोधन मंच व सत्यशोधक समाज प्रतिष्ठान तर्फे २०२५ या वर्षात संविधान अमृत महोत्सवानिमित्त ‘संविधान जागर महाव्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी संविधान संस्कृतीचे गाढे अभ्यासक प्रा.डाॅ.अनंत राऊत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक प्रा.एस.एम.देवरे तर प्रमुख पाहुणे म्हणून संविधान गौरव समितीचे जिल्हाउपाध्यक्ष व्ही.आर.आसोरे व शाळेचे पर्यवेक्षक व्ही.एस.पाटील उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी बोलतांना प्रा.डाॅ.अनंत राऊत सांगितले की ,जगातील सर्वांत मोठी आणि प्रबळ लोकशाही असलेल्या देशात सर्व जाती,धर्म, वेगवेगळी भौगोलिक परिस्थिती, विशिष्ट अंतरावर बदलणारी संस्कृती या सर्वांना एकत्र आणण्याचे काम भारतीय संविधानाने केलेले आहे, म्हणूनच संविधान समजून घेण्याची सुरुवात शालेय जीवनापासून व्हायला हवी,संविधानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देणे हे पालक,शाळा या दोघांची सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केले.

संविधाना मुळेच आपला देश अखंड आहे,संविधान हा आपल्या लोकशाहीचा पाया असल्याने तो आपल्या जीवनाचा अविभज्य घटक देखील आहे.जगात जिथे जिथे बुध्दिवादाच्या कसोटीवर टिकणारा समग्र मानवी कल्याणाचा विचार दिसतो तो तो विचार भारतीय संविधानाने स्वीकारलेला आहे.

त्याचबरोबर भारताच्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय जनमानसिकतेचे वास्तवाधिष्ठित आकलन करून समग्र भारतीय समाजाला अधिकाधिक उपकारक ठरणारा विचार देण्याचा प्रयत्न भारतीय संविधानाने केलेला आहे.

म्हणजेच भारतातील सर्व गटातटांच्या इच्छा आकांक्षाचा विचार,संकुचित विचारांना नकार, अंधश्रध्दांना नकार, तोडणाऱ्या विचारापेक्षा जोडणाऱ्या विचारांवर भर,एका गटातटाच्या कल्याणापेक्षा समग्र जणांच्या कल्याणाचा विचार, दुर्बल घटक दुर्बल न राहता तेही सबल झाले पाहिजेत आणि त्या घटकांच्या सबलीकरणाचे नियोजन केले पाहिजे हा विचार संविधानाच्या केंद्रस्थानी आहे.

सर्वजणकल्याणातून राष्ट्रकल्याण ही भारतीय संविधानाची भूमिका आहे.म्हणूनच भारतीय संविधान हा आजवरच्या ग्रंथांमधील व्यापक व सखोल आवाहन क्षमता असलेला सर्वश्रेष्ठ असा राष्ट्र ग्रंथ आहे. संविधान हा केवळ कायद्याचा ग्रंथ नाही, राजकीय, सामाजिक व आर्थिक भूमिका मांडणारा ग्रंथच नाही तर तो भारत या राष्ट्राची सर्व अंगांनी निर्माणक्षम व कल्याणकारक अशी पुनर्मांडणी करू पाहणारा भारताचा सर्वसमावेशक राष्ट्र ग्रंथ आहे.

भारताचे संविधान शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले तर राज्याच्या आणि राष्ट्राच्या उभारणीत ते योग्य दिशेने आपापल्या क्षेत्रात भरीव असे कार्य करू शकतात. शाळेचे मुख्याध्यापक प्रा.एस.एम.देवरे यांनी अध्यक्षीय समारोप केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.पी. जाधव तर आभार बी.बी.पाटोळे यांनी मानले.यावेळी शालेय शिक्षक व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीरीत्या राम विजापुरे, नामदेव कोनापुरे यांनी विशेष प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!