हिमायनगर,अनिल मादसवार| तालुक्यातील आयटीआय ते सिरंजनी रस्ता पावसाने चिखलमय झाला असून, या रस्त्यावरून दररोज प्रवास करणाऱ्या हजारो नागरिक व शाळकरी विद्यार्थ्यांचे जीवित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्यावर तात्काळ उपाययोजना कराव्या. या रस्त्याच्या २ किमी दुरुस्तीच्या कामाकडे सबंधितांनी लक्ष देऊन शालेय विद्यार्थी व शेतकरी व नागरिकांची होणारी दैना थांबवावी अशी मागणी या भागातील नागरीकातून केली जात आहे.
हादगा- हिमायतनगर मतदार संघात असलेल्या हिमायतनगर ते सिरंजनी या रस्त्याला जोडणारा आयटीआय ते सिरंजनी पॉईंट रस्ता २ किलोमीटर लांबीचा आहे. हा रस्ता सरसम जिल्हा परिषद गटातील असून, जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे येतो आहे. या रस्त्याचे १ किलोमीटर काम अंदाजे २५ वर्षांपूर्वी करण्यात आले होते. तेव्हापासून मागील काही महिन्यापूर्वी विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणारी बस मागील २ महिन्यापूर्वी पाईपला पडलेल्या भगदाड आणि खड्यामुळे फसली होती. याबाबतचे वृत्त नांदेड न्यूज लाइव्हमध्ये प्रकाशित झाल्यानंतर तसीलदार यांच्या सूचनेवरून तलाठी यांनी या रस्त्यावरील खड्ड्यावर मुरूम टाकून तात्पुरती दुरुस्ती केल्याने बससेवा सुरु करण्यात आली होती.
आता मात्र पावसामुळे या रस्त्यावर चिखल होऊन दयनीय अवस्था झाली आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या हजारो नागरिक व शाळकरी विद्यार्थ्यांच्या जीवित्वाला धोका निर्माण झाला आहे. सध्या पावसाळा सुरु झाला असून, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य पसरले असून रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. चिखलामुळे दुचाकी वाहन घसरत आहे तर खड्ड्यामुळे बस फासत आहे. या प्रकारामुळे एसटी महामंडळ बस येत नसल्याने या रस्त्यावर प्रवास करणारे नागरिक व विद्यार्थी संतप्त झाले आहे. नागरिकांना प्रसूती अपघात या सारख्या आपत्कालीन रुग्णांना दवाखान्यात नेण्यात अडचण होत आहे. या रस्त्याविषयी अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आला. मात्र या रस्त्याची समस्या निकाली काढण्यात प्रशासनाची व लोकप्रतिनिधीची उदासीनता दिसून येत आहे.
शासन ग्रामीण भागातील नागरिकांना मोजता ही न येणाऱ्या संख्ये एवढे रुपये खर्च करून महामार्ग आणि मतदानाच्या सोयीच्या ठिकाणचे रस्ते करण्यात व्यस्त आहेत. मात्र ग्रामीण भागातील रस्त्याकडे लोकप्रतिनिधी व शासनाचे दुर्लक्ष का..? असा संतापजनक सवाल ग्रामीण भागातील नागरिक व शालेय विद्यार्थ्यांचे पालक विचारीत आहेत. आमच्या भागातील नागरिकांना केवळ मतदान करण्यापुरतेच महत्व आहे का? आम्हाला फक्त हा रस्ता करून द्यावा, अशा संतप्त भावना आता या भागातील नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.
यापूर्वी दोन वेळा दयनीय अवस्था झालेल्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्र ते सिरंजनी रस्त्याची दुरुस्ती युवा सेनेचे विशालभाऊ राठोड आणि सिरंजनीचे युवा कार्यकर्ते पवन करेवाड यांनी स्वखर्चाने करून दिली होती. मात्र सध्या सुरु झालेल्या पावसामुळे हा रस्ता पुन्हा जैसे थेच झाला आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थाना घेऊन जाणारी बस वारंवार फसून बसत असल्याने नागरिक व विद्यार्थीं प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या नावाने बोट मोड़ीत आहेत. तात्काळ या रस्त्याच्या २ किमी दुरुस्तीच्या कामाकडे सबंधितांनी लक्ष देऊन शालेय विद्यार्थी व शेतकरी व नागरिकांची होणारी दैना थांबवावी अशी मागणी या भागातील नागरीकातून केली जात आहे.