नांदेड| स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत “स्वच्छ माझे अंगण” हे महत्त्वपूर्ण अभियान नांदेड जिल्ह्यात 1 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2024 दरम्यान राबविण्यात येणार आहे. हागणदारीमुक्त (ओडीएफ) मॉडेल गावे तयार करणे आणि घरगुती स्वच्छता सवयींना प्रोत्साहन देण्यासाठी हे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती, नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी दिली आहे.
वैयक्तिक शौचालयांचा नियमित वापर, घनकचरा व्यवस्थापन, आणि सांडपाणी व्यवस्थापनाचे प्रभावी अंमलबजावणी हे या अभियानाचा उद्देश आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येईल. गट विकास अधिकाऱ्यांना त्यांच्या तालुक्यातील सर्व गावांचे नियोजन करून नागरिकांना सहभागी करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ग्रामसेवकांच्या माध्यमातून अभियानाची माहिती ग्रामस्थाना देण्यात येणार आहे.
अभियानात सहभागी झालेल्या कुटुंबांचा यशोचित सत्कार करण्यात येईल. सहभागी कुटुंबांनी घरगुती खतखड्डा, परसबाग, वैयक्तिक शोषखड्डा किंवा पाझखड्डा, वैयक्तिक शौचालय आणि घरगुती कचराकुंड्या ठेवणे आवश्यक आहे. अशा कुटुंबांना 2 ऑक्टोबर 2024 रोजी ग्रामपंचायतीच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मानित केला जाणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, ग्राम पंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापेस व जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी गावकऱ्यांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
अभियान कालावधीचे टप्पे:
– अभियान कालावधी: 1 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2024
– पडताळणी कालावधी: 26 ते 30 सप्टेंबर 2024
– पात्र कुटुंबांना निमंत्रण: 1 ऑक्टोबर 2024
– प्रशस्तीपत्र वितरण: 2 ऑक्टोबर 2024