नांदेड| स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत 25 सप्टेंबर रोजी “महाश्रमदान : एक दिवस, एक तास, एक साथ” हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार असून, सर्व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी केले आहे.


महाश्रमदान सकाळी 8 ते 9 या वेळेत घेण्यात येणार असून प्रत्येक गावात एकत्रित स्वच्छता मोहीम होईल. यामध्ये लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी-कर्मचारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, पत्रकार, समाजसेवक, जलसुरक्षक, महिला बचत गट आदींचा सहभाग अपेक्षित आहे.

या अंतर्गत जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, रेल्वे स्थानके, घाट-नाले, धार्मिक व पर्यटन स्थळे, ऐतिहासिक वास्तू, शैक्षणिक संस्था, बाजारपेठा, कार्यालयीन व ग्रामपंचायत आवार येथे स्वच्छता करण्यात येणार आहे.


या उपक्रमासाठी सीईओ मेघना कावली यांच्यासह अतिरिक्त सीईओ संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी. गिरी, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक अमित राठोड व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब यांनीही ग्रामस्थांना सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.


