उस्माननगर,माणिक भिसे| उस्माननगर (ता. कंधार) ग्रामपंचायतीतील विविध विकास कामांतील गैरव्यवहाराबाबत करण्यात आलेल्या तक्रारीकडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांनी दुर्लक्ष केल्याची भावना स्थानिक नागरिकांत व्यक्त होत आहे. महिनाभर उलटूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने निवेदनदारांनी नुकतीच सीईओ यांची भेट घेऊन याबाबत विचारपूस केली.


ग्रामपंचायत उस्माननगर येथील दलित वस्ती सुधार योजना आणि १५ व्या वित्त आयोग निधीमधून करण्यात आलेल्या कामांची चौकशी व्हावी, अशी मागणी गजानन सूर्यवाड यांनी ३ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा परिषदेच्या सीईओ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. निवेदनात तत्कालीन सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी बोगस कामे करून शासनाची दिशाभूल केली व लाखो रुपयांचा निधी हडप केला, असा गंभीर आरोप करण्यात आला होता.


या कामांची तपासणी करण्यासाठी विशेष समिती स्थापन करून चौकशी केल्याशिवाय सदर निधीची बिले मंजूर करू नयेत, अशी मागणी देखील या निवेदनात केली होती. मात्र दीड महिना लोटूनही कोणतीही चौकशी सुरू न झाल्याने गजानन सूर्यवाड आणि ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी गंगाधर भिसे यांनी सीईओंची भेट घेतली.


स्थानिकांचा सवाल असा आहे की, “बीडीओ या निवेदनाकडे गांभीर्याने विचार करायला धजावत नाहीत का?” नांदेड जिल्ह्यात सीईओ मॅडम या कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखल्या जातात, मग उस्माननगर ग्रामपंचायतीच्या या गंभीर तक्रारीकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.



