उस्माननगर, माणिक भिसे l आगामी काळात होणाऱ्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उस्माननगर पोलिस स्टेशनच्या प्रांगणात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कंधार लोह्याच्या उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ आश्विनी जगताप यांनी गणेशोत्सव शिस्तीत व शांततेच्या वातावरणात साजरा करा असे आवाहन केले.


उस्माननगर पोलिस स्टेशन यांच्या वतीने पोलिस स्टेशनच्या प्रांगणात आगामी काळात येणाऱ्या सण उत्सव निमित्ताने शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कंधार लोहा तालुक्याच्या उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ आश्विनी जगताप या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.तर प्रमुख पाहुणे म्हणून सपोनि संजय निलपत्रेवार , युवा कार्यकर्ते देवराव पांडागळे , दत्ता पाटील घोरबांड, सरपंच प्रतिनिधी माणिक काळम व ६२ गावातील पोलिस पाटील , जयंती मंडळांचे पदाधिकारी , श्री गणेश उत्सव समितीचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.


यावेळी प्रथम पोलिस स्टेशनच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ आश्विनी जगताप सह अनेकांचे पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.त्यानंतर सपोनि संजय निलपत्रेवार यांनी शांतता समिती बैठकी विषयी प्रास्ताविकात म्हणाले की , आगामी काळात येणाऱ्या गणेश उत्सव , ईद -ए-मिलाद सह अन्य उत्सव काळात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी नागरिकांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे , पोलिस प्रशासन नेहमी दक्ष असून नागरिकांनी योग्य माहिती द्यावी ,. उत्सव काळात येणाऱ्या अडचणी व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तात्काळ सोडविण्यावर भर दिला जाईल.


कोणत्याही नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये , उत्सव काळात गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. यासाठी चांगले नियोजन केले , असून नागरिकांना कोणतीही अडचण येणार नाही. याची काळजी प्रशासनाकडून घेत असल्याचे सपोनि संजय निलपत्रेवार यांनी सांगितले. परिसरातील श्री ची प्रतिष्ठापना दरम्यान गणेशोत्सव काळात मंडळांनी विधायक कार्यक्रम घेऊन समाज प्रबोधनाची कार्यक्रम घ्यावीत.डी.जे मुक्त वातावरणात श्री ची मिरवणूक काढुण जल्लोष साजरा करावा असे सांगितले.

त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ जगताप म्हणाले की, गणेशोत्सव, ईद -ए-मिलाद हे सण येत्या काळात एकत्रित येत आहेत. उस्माननगर परिसरात हे सण साजरे करताना सर्व धर्मियांनी एकमेकात परस्पर सौहार्द व शांतता ठेवून सण उत्सव साजरे करावेत. पर्यावरण संरक्षणासाठी नागरिकांनी पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर द्यावा असे आवाहन केले.यावेळी उस्माननगर पोलिस स्टेशन अंतर्गत गावातील प्रतिष्ठित नागरिक, गणेश मंडळाचे कार्यकर्ते, मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

