नांदेड | ‘हिंद-दी-चादर’ म्हणून ओळखले जाणारे शिखांचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या महान शहीदी समागम वर्षानिमित्त आज नांदेड नगरी अक्षरशः भक्तिरसात न्हाऊन निघाली. आकाशात घुमणारा “बोले सो निहाल… सत श्री अकाल” चा जयघोष, हेलिकॉप्टरमधून होत असलेली पुष्पवृष्टी, हजारो भाविकांचा उसळलेला भक्तिभाव आणि शिस्तबद्ध भव्य नगर कीर्तन — या सर्वांनी आजचा दिवस नांदेडच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला.


या ऐतिहासिक नगर कीर्तनाला आज सकाळी ८ वाजता तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिबजी येथून प्रारंभ झाला. प्रारंभी गुरुद्वारात विधिवत अरदास करण्यात आली. गुरुद्वाराच्या गेट क्रमांक १ जवळ श्री गुरु ग्रंथ साहिबजींची पालखी येताच नांदेड पोलीस दलाच्या वतीने मानवंदना (Guard of Honor) देण्यात आली. याच वेळी हेलिकॉप्टरद्वारे करण्यात आलेली पुष्पवृष्टी हे दृश्य उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरले.


पंच प्यारे साहिबान यांच्या नेतृत्वाखाली नगर कीर्तन
हे भव्य नगर कीर्तन मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंत सिंग जी, भाई जोतिंदर सिंग जी, मुख्य ग्रंथी भाई कश्मीर सिंग जी, भाई रामसिंग जी व भाई गुरुमीत सिंग जी या पंच प्यारे साहिबान यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली काढण्यात आले. सुशोभित व आकर्षक रथामध्ये श्री गुरु ग्रंथ साहिबजी विराजमान होते. या पवित्र पालखीमध्ये भाई कश्मीर सिंग जी यांनी अत्यंत भक्तिभावाने सेवा बजावली.



या पावन सोहळ्यास राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार अशोक चव्हाण, शहीदी समागम समितीचे राज्य समन्वयक रामेश्वर नाईक यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहून गुरुचरणी नतमस्तक होत नगर कीर्तनात सहभाग नोंदवला. तसेच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार (भा.पो.से.), नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त महेशकुमार डोईफोडे, गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंग (से.नि. भाप्रसे), सहकारी जसविंदर सिंग (बॉबी) व हरजितसिंग कडेवाले यांनीही नियोजनात सक्रिय सहभाग घेतला.

यानगर कीर्तनात शीख धर्माची परंपरा आणि महाराष्ट्राची लोकसंस्कृती यांचा सुरेख संगम पाहायला मिळाला. शीख तरुणांची थरारक ‘गतका’ प्रात्यक्षिके हजारो शालेय विद्यार्थिनींचे लेझिम नृत्य ढोल-ताशांचा गजर यामुळे संपूर्ण वातावरण भक्ती आणि उत्साहाने भारून गेले. एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी “मानवता की सच्ची मिसाल” व “हिंद दी चादर” असे फलक हातात घेऊन सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.
गुरुद्वारा गेट क्रमांक १ ते मोदी मैदान या सुमारे चार किलोमीटरच्या मार्गावर दोन्ही बाजूंनी हजारो शालेय विद्यार्थी शिस्तबद्ध रांगेत उभे राहून नगर कीर्तनाचे स्वागत करत होते. फुलांची उधळण, सडा-रांगोळी आणि नागरिकांनी केलेली सजावट पाहून उपस्थित भाविक भावूक झाले. गुरुद्वारा चौक, महावीर चौक, वजिराबाद, तिरंगा चौक, रामसेतू, रवी नगर, नागार्जुन शाळा मार्गे हे भव्य नगर कीर्तन मोदी मैदान येथे पोहोचले. श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या त्याग, शहिदी व मानवतेच्या संदेशाने आज नांदेड नगरी धन्य झाली.

