हदगाव, गौतम वाठोरे | तालुक्यातील वाळकी फाटा परिसरात केदारनाथ पेट्रोल पंपाच्या पाठीमागील दगडाच्या खदानीत एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे नाव कमल क्षीरसागर (वय ५५) असून त्या हदगाव तहसील कार्यालयात चपराशी म्हणून कार्यरत होत्या.


कमल क्षीरसागर या गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होत्या. आज सकाळी त्यांचा मृतदेह खदानीत आढळून आल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर मृत्यू आत्महत्या आहे की घातपात, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती स्पष्ट झालेली नाही.

घटनेची माहिती मिळताच हदगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी हदगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.



दरम्यान, मृतदेहावर काही जखमेच्या खुणा आढळून आल्याने घातपाताची शक्यता व्यक्त केली जात असून, पोलीस याप्रकरणी सर्व बाजूंनी सखोल तपास करीत आहेत. या घटनेने तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, शवविच्छेदन अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


