“कमळ दाबा… विकास माझी जबाबदारी!” माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाणांचा दमदार संदेश
डॉ. वानखेडेंनी लोकांचे प्राण वाचवले… आता शहर वाचवणार!
‘देवाभाऊ’ मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी, निधीची चिंता नाही चव्हाणांचे आश्वासन


हिमायतनगर, अनिल मादसवार| “हिमायतनगरचं मेजर ऑपरेशन करायचं असेल, शहराला नवीन जीवनदान द्यायचं असेल तर अनुभवी शल्यचिकित्सकाप्रमाणे काम करणाऱ्या डॉ. राजेंद्र वानखेडेंना एक संधी द्या,” असे प्रभावी आवाहन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण (Former Chief Minister Ashokrao Chavan) यांनी जाहीर सभेत केले.


गेल्या तिस–पस्तीस वर्षांपासून विविध आजारांवर उपचार करून हजारो रुग्णांचे प्राण वाचवणारे, स्वच्छ प्रतिमेचे आणि लोकाभिमुख विचारांचे डॉ. राजेंद्र वानखेडे हे भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असल्याचे सांगताना खासदार चव्हाण म्हणाले की, “राजकारणात चांगली माणसं येणं आवश्यक आहे. ज्यांनी आयुष्यभर लोकांची सेवा केली, त्यांना शहरसेवेची संधी मिळाली पाहिजे.”



परमेश्वर मंदिर परिसरात शुक्रवारी आयोजित सभेत त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, “राज्यात भाजपची सत्ता आहे. मुख्यमंत्री देवाभाऊ तुमचेच आहेत. त्यामुळे निधी, सुविधा, विकास—यात कुठलाही अडथळा येऊ देणार नाही. नगराध्यक्ष आणि नगरसेवक दोन्ही भाजपचेच असायला हवेत. तुम्ही विश्वास ठेवा… विकासाची पूर्ण जबाबदारी मी घेतो.”


खासदार चव्हाण पुढे म्हणाले कि, “अशोक चव्हाण जे बोलतो ते करून दाखवतो. आजची सभेची गर्दीच सांगते की मतदारांनी आजच मतदान करून डॉ. वानखेडेंना विजयी केले आहे. मतदान काही दिवसांवर येऊन ठेपले आहे… कोणताही विचार न करता मतदान यंत्रावर थेट ‘कमळ’ चिन्हासमोरील बटन दाबा आणि प्रचंड मतांनी भाजपच्या उमेदवारांना निवडा.” सभेतील उत्साह, घोषणाबाजी आणि नागरिकांची उसळलेली गर्दी पाहता हिमायतनगरच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडण्याची संकेत दिसत होते.
यावेळी सभेच्या मंचावर जिल्हाध्यक्ष अॅड. किशोर देशमुख, गिरीश जाधव, डॉ. प्रसाद डोंगरगावकर, जिल्हा सचिव काशिनाथ शिंदे, डॉ. अंकुश देवसरकर, गजानन तुप्तेवार यांसह भाजपचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष गजानन चायल यांनी केले. सूत्रसंचालन कल्याणसिंह ठाकूर यांनी तर आभार प्रदर्शन नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. राजेंद्र वानखेडे यांनी मानले.

