नांदेड | भाग्यनगर गुन्हे शोध पथकाने प्रभावी कारवाई करत एका आरोपीकडून चोरीच्या २२ सायकली (अंदाजे किंमत २ लाख ३७ हजार रुपये) जप्त केल्या असून संबंधित आरोपीस अटक करण्यात आली आहे. ही कारवाई भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. याप्रकरणी गु.र.नं. ६६०/२०२५, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.१६ वाजता हा गुन्हा उघडकीस आला असून, २३ डिसेंबर २०२५ रोजी अहवाल दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी वाहन व सायकल चोरी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास सुरू केला.

गोपनीय माहितीच्या आधारे कल्याणनगर, नांदेड येथे संशयित माधव गणपत मारे (वय ४५, रा. कल्याणनगर, नांदेड) याच्या घराची झडती घेण्यात आली. झडती दरम्यान घराजवळ व परिसरातून एकूण २२ सायकली आढळून आल्या. चौकशीत आरोपीने नांदेड शहरातील क्लासेस परिसर तसेच विविध भागांतून विद्यार्थ्यांच्या सायकली चोरी केल्याची कबुली दिली. सदर सायकली जप्त करून आरोपीस अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस अंमलदार एन. टी. चापके (बक क्र. ७४७) करीत आहेत.


ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर), अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर बेंजने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या यशस्वी कामगिरीबद्दल संबंधित अधिकारी व अंमलदारांचे पोलीस अधीक्षकांनी अभिनंदन केले आहे.


