नांदेड| वृत्तपत्र विक्रेता दिन व २५ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा वृत्तपत्र विकास मंडळ आणि ‘सकाळ ‘ माध्यम समुहाच्या वतीने बुधवारी (ता.९) वृत्तपत्र विक्रेता बांधवांसाठी सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सकाळी नऊ वाजता चैतन्य नगर शिवमंदिर ते सांगवी दरम्यान, होणार आहे.
वर्षातील ३६५ दिवस उन, पाऊस, थंडी या कशाचीही तमा न बाळगता घरोघरी वृत्तपत्र टाकण्याचे काम विक्रेता बंधू करतात. अनंत अडचणींना तोंड देत विक्रेता बंधू लोकापर्यंत वर्तमानपत्राच्या माध्यमातून माहिती, ज्ञान पोहचविण्याचे काम करतात. रोजच्या या धकाधकीच्या जीवनशैलीत त्यांनाही आपल्यातील उपजत कलागुणांना वाव देता यावा, यासाठी जिल्हा वृत्तपत्र विकास मंडळ आणि ‘सकाळ ‘ माध्यम समुहाच्या वतीने बुधवारी (ता.९) वृत्तपत्र विक्रेता बांधवांसाठी सायकल स्पर्धेचे आयोजन केले आहे. चैतन्य नगर शिवमंदिर ते सांगवी व परत शिवमंदिर अशी ही स्पर्धा होणार आहे.
या स्पर्धेला अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव हे हिरवी झेंडी दाखविणार आहेत. अध्यक्षस्थानी नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर हे राहतील तर प्रमुख उपस्थिती जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गोवर्धन बियाणी, जिल्हा कोषाध्यक्ष कृष्णा उमरीकर आदी मान्यवर राहणार आहेत. या स्पर्धेत वृत्तपत्र टाकणा-या बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाचे अध्यक्ष बालाजी पवार, समिती प्रमुख चंद्रकांत घाटोळ, समिती उपप्रमुख बालाजी चंदेल यांनी केले आहे.