नांदेड| डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन येत्या ७ नोव्हेंबर रोजी भीम महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने नुकतीच एक बैठक पार पडली. भीम महोत्सवाच्या माध्यमातून शैक्षणिक चळवळ वाढीस लागावी, असा सूर उपस्थित मान्यवरांनी काढला. नांदेडमध्ये आयोजित भीम महोत्सवाच्या पूर्वतयारीसंदर्भात विसावा पॅलेस येथे शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते दिगंबरराव मोरे यांची उपस्थिती होती.
या बैठकीला सेवानिवृत्त अभियंता अशोक गायकवाड, इंजि. भारत कानिंदे, सेवानिवृत्त कर्मचारी सम्राट हटकर, अशोक कांबळे, गणपत गायकवाड, ऍड. मंगेश वाघमारे, शेषराव वाघमारे, राज गोडबोले यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी भीम महोत्सव समितीचे मुख्य समन्वयक म्हणून मुरलीधर हंबर्डे, नितीन एंगडे, अश्विन सरोदे, संकेत जमदाडे, विश्वजित शुरकांबळे, राहुल खंडेलोटे, संदेश वाघमारे, अभिमान राऊत, अंकुश सावते, लक्ष्मण वाठोरे, तक्षक मल्हारे, हर्षद सरोदे, ऋषिकेश खंदारे यांची निवड करण्यात आली.
७ नोव्हेंबर हा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील सर्वात महत्वाचा क्रांतिकारी दिन आहे. या दिवसापासूनच बाबासाहेबांच्या जीवनाला क्रांतिकारी वळण लागले. भीम महोत्सव हा एक इव्हेंट म्हणून साजरा न होता, ती एक शैक्षणिण चळवळ येत्या काळात उभी व्हावी, असा विचार संयोजक प्रा. प्रबुद्ध चित्ते यांनी व्यक्त केला. फुले, शाहू, आंबेडकरांना अभिप्रेत असलेला समाज हा शिक्षणातूनच निर्माण होतो म्हणून शैक्षणिक चळवळ वाढीस लावण्याच्या हेतूने भीम महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. प्रतिकूल परिस्थितीतून ज्या पालकांनी आपल्या पाल्यांना उच्च शिक्षण देऊन सन्मार्गाने जीवन जगण्याचे धडे दिले त्या पालकांना या भीम महोत्सवात आदर्श पालक म्हणून सन्मानीत करण्यात येणार असल्याचेही संयोजकांनी सांगितले.