नांदेडमुंबईलेख

Ban on conversion : फाळण्या टाळण्यासाठी ‘धर्मांतरबंदी’ आवश्यक !

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी संकलित केलेला मराठी लेख ….

प्रस्तावना : भारताची फाळणी धर्माच्या आधारावर झाली. हिंदूंसाठी भारत आणि मुसलमानांसाठी पाकिस्तान निर्माण झाला. धर्माच्या आधारावर फाळणी झाल्यानंतर खर्‍या अर्थाने हिंदूंसाठी असलेल्या भूप्रदेशात हिंदूंचे रक्षण करणे, हे सरकारचे नैतिक दायित्व आहे; पण अद्यापपर्यंत कुठल्याच सरकारने त्याकडे विशेष लक्ष दिले नाही, हे हिंदूंचे दुर्दैव आहे. आज सरगना जलालुद्दिन (छांगुर बाबा) सारखे लोक मोकाटपणे धर्मांतराचे रॅकेट चालवतात, आफताबसारखा धर्मांध श्रद्धा वालकरचे ३५ तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवतो, ख्रिस्ती पंथ स्वीकारण्यासाठी दबाव आणणार्‍या मिशनर्‍यांना कंटाळून लावण्या, ऋतुजा यांसारख्या हिंदु मुली स्वतःचे आयुष्य संपवतात. ‘लव्ह जिहाद’ची घटना उघडकीला आली नाही, असा एकही दिवस जात नाही; तरीही यावर कोणतीच कठोर उपाययोजना काढली जात नाही, याचे वैषम्य आहे. अखेर किती हिंदूंचे आयुष्य संपल्यानंतर, हिंदूंची संख्या अजून किती टक्के कमी झाल्यावर धर्मांतरबंदी कायदा होणार आहे ?

हिंदु धर्म आणि अन्य पंथांमधील मूलभूत भेद : मुळात इस्लाम आणि ख्रिस्ती पंथ यांची भूमिका विस्तारवादाची आहे. इस्लाम पंथ ‘दारूल इस्लाम’ म्हणजे संपूर्ण जगावर इस्लामचे राज्य आणायचे असल्याचे सांगतो, तर ख्रिस्ती ‘ग्रेट कमिशन’वर विश्वास ठेवतात. ‘ग्रेट कमिशन’ म्हणजे संपूर्ण जगाला ख्रिस्तमय करण्याविषयी येशूने दिलेली आज्ञा ! त्यामुळे कधी बळजोरीने, तर कधी आमीष दाखवून हिंदूंचे धर्मांतर केले जाते. याउलट हिंदु धर्म ‘वसुधैव कुटुम्बकम्’ म्हणजे संपूर्ण विश्वच कुटुंब असल्याचे मानतो. त्यामुळे विस्तारवादी पंथांपासून हिंदु धर्माचे रक्षण करणे आवश्यक आहे. आतापर्यंत अनेक घटनांमधून हे उघड झाले आहे की, भारतात असणारे मदरसे आणि कॉन्व्हेंट शाळा एकप्रकारे हिंदूंच्या धर्मांतराचे अड्डे बनले आहेत. बलपूर्वक किंवा फसवून केल्या जाणार्‍या धर्मांतराला वेळीच आळा घातला नाही, तर भारताचे अजून विभाजन होण्याचा धोका आहे. वर्ष १९४७ मध्ये देशाची एक फाळणी झाली होती; हिंदूंची घटती लोकसंख्या रोखण्यासाठी कठोर पावले उचलले नाहीत, तर अजून फाळण्या पहाण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटले होते, धर्मांतर हे राष्ट्रांतर आहे. धर्मांतर झाल्याने एक हिंदु कमी होत नाही, तर हिंदु धर्माचा एक शत्रू वाढतो. त्यामुळे किमान भारत टिकवण्यासाठी धर्मांतरबंदी कायद्याची आवश्यकता आहे.

भारतातील १० राज्यांमध्ये हिंदु अल्पसंख्य : वर्ष 1947 मध्ये नागभूमीत (नागालँडमध्ये) अवघे 200 ख्रिस्ती होते. आता ते देशातील सर्वांत मोठे ख्रिस्ती राज्य म्हणून उदयास आले आहे. वर्ष 2011 च्या जनगणनेनुसार तेथील 87.93 टक्के नागरिक ख्रिस्ती आहेत. त्यांतील 75 टक्क्यांहून अधिक ख्रिस्ती ‘बाप्तिस्ट’ चर्चशी संबंधित असल्याने ‘जगातील बाप्तिस्टांचे एकमेव प्रमुख राज्य’ अशी त्याची ख्याती आहे. मिझोराममध्येही ८७ टक्के, तर मेघालयमध्ये ७० टक्के ख्रिस्ती आहेत. मेघालयमधील सर्व शासकीय समाजकल्याण योजना ख्रिस्ती संघटनांच्या माध्यमातून राबवण्यात येतात.

मणिपूर राज्यात ख्रिस्तीकरण करणे सुलभ होण्यासाठी मिशनर्‍यांनी ‘लिटल फ्लॉवर स्कूल’, ‘डॉन बॉस्को हायस्कूल’, ‘सेंट जोसेंफ कॉन्व्हेंट स्कूल’, ‘निर्मला बास हायस्कूल’ इत्यादी ख्रिस्ती शाळा 20 व्या शतकात चालू केल्या. मणिपुरी भाषेतील साहित्यामध्ये केवळ बायबल आणि ख्रिस्त्यांशी संबंधित पुस्तके आहेत. दुसरीकडे लक्षद्वीपमध्ये मुसलमानांची लोकसंख्या ९६ टक्के आहे. जम्मू-काश्मीर, लडाख हेही मुसलमानबहुल प्रदेश आहेत. या सर्व प्रदेशात राष्ट्रीयत्वाची भावना कमी झाली आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात नियोगी आयोगाने मिशनर्‍यांचे मनसुबे उघडे करतांना स्पष्टपणे म्हटले होते की, ‘ख्रिस्ती मिशनर्‍यांनी चालवलेली विविध ‘औदार्यपूर्ण’ कामे, म्हणजे धर्मांतराचे त्यांचे कार्य निर्विघ्नपणे चालावे, यासाठी धारण केलेले मुखवटे आहेत. ‘स्वतःचे संख्याबळ वाढवून त्याच्या सामर्थ्यावर स्वतःसाठी एक ख्रिस्ती राज्य उभे करायचे’, ही महत्त्वाकांक्षा त्यांच्या या सर्व हालचालींच्या मुळाशी आहे. या एकाच उद्देशाने ते कोट्यवधी रुपये खर्च करत आहेत’; पण काँग्रेसने या अहवालाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. उलट काँग्रेसच्या कार्यकाळात धर्मांतराच्या कारवायांना ‘सोनिया’चे दिवस आले होते. गेल्या काही वर्षांत केंद्रात सरकार पालटल्याने धर्मांतराच्या कारवाया करणार्‍यांनी आपणहून त्यांचा गाशा गुंडाळला असू शकतो का ? यंदाच्या महाराष्ट्रातील पंढरपूरच्या वारीमध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांनी वाटलेली येशूची पत्रके आणि तिरुपती बालाजी देवस्थानमधील पदाधिकारी मिशनरी निपजणे या २ ताज्या घटना या प्रश्नांची उत्तरे देण्यास पुरेशा आहेत.

सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे धर्मांतराची समस्या मांडण्यात आली.त्यानुसार राज्यात धर्मांतर विरोधात कायद्याच्या अभ्यासासाठी समिती नेमली आहे. या समितीच्या अहवालातील सूचनांचा विचार करून पुढील अधिवेशनात धर्मांतरविरोधी कायदा मान्यतेसाठी सादर केला जाईल, असे गृह राज्यमंत्री यांनी विधान परिषदेत सांगितले.

धर्मांतरित हिंदूंनी काय कमावले-काय गमावले : हिंदु धर्मांतरित होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे धर्मशिक्षणाचा अभाव ! दुसर्‍या पंथात गेल्यानंतर आर्थिक विवंचना संपतील किंवा चांगली वागणूक मिळेल, या विचारांनी हिंदु धर्मांतरित होतात; पण प्रत्यक्षात तसे घडत नाही. दुसर्‍या पंथात गेल्यानंतर कुणावरचेही आर्थिक संकट दूर झालेले नाही. तसे असते, तर आज अनेक देश ख्रिस्ती पंथीय आहेत, त्या देशात गरिबी नसती. त्या जोडीला धर्मांतरित झालेल्या हिंदूंना भेदभावाचा सामना करावा लागतो. दुसर्‍या पंथातील लोक ‘ते तर पूर्वी हिंदु होते’, असे शुद्र दृष्टीने पहातात. हिंदु धर्माचा त्याग केल्याने ते हिंदु धर्मापासून, सण-उत्सव-परंपरा-चालिरिती, नातेवाईक यांच्यापासूनही दुरावतात. त्यामुळे धर्मांतरित हिंदूंची अवस्था हालाखीची होते. या परिस्थितीचा सामना केलेले कित्येक जण आज पुन्हा हिंदु धर्मात परतू इच्छितात. त्यांच्याही शुद्धीकरणाची एक व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे.

विदेशी निधीवर पोसली जाणारी बांडगुळे : हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी जगभरातून प्रचंड पैसा ओतला जात आहे. हा पैसा केवळ आणि केवळ भारताची शकले पाडण्यासाठी आहे. बॉलीवूड, वेब सीरीज्सारखी माध्यमे ही त्यासाठीची पार्श्वभूमी तयार करतात. औरंगजेब, बाबर, गझनी, टिपू सुलतान यांचे वंशज आज त्यांचेच कार्य पुढे चालवत आहेत. त्यातच सर्वधर्मसमभाव किंवा सेक्युलर या शब्दांच्या माध्यमातून हिंदूंच्या डोळ्यांत धूळफेक केली जात आहे. थोडक्यात, आज जरी भारत हिंदुबहुल दिसत असला, तरी त्यातील अनेक जण वैचारिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अहिंदु झालेच आहेत.

धर्मशिक्षणाची केंद्रे व्हावीत : सक्तीने होणारे धर्मांतर रोखण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर सक्षम कायदा करून त्याची प्रभावी कार्यवाही करण्याच्या जोडीला गावागावांमध्ये हिंदूंची धर्मशिक्षण केंद्रे उभी करण्याची आवश्यकता आहे. भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे, ‘स्वधर्मे निधनं श्रेयः, परधर्मा भयावहः’ ! धर्मवीर संभाजी महाराज, गुरु गोविंदसिंह यांनी हे प्रत्यक्ष आचरणात आणले. त्यांचा केवळ जयजयकार करून उपयोगाचे नाही, तर त्यांच्यासारखी धर्मनिष्ठा अंगीकारणे महत्त्वाचे आहे. जर हिंदु मनामनांत हिंदुत्व फुलले, तर कुणीही मेरी किंवा कुणीही मोहसीन हिंदूंना कपटाने धर्मांतरित करू शकणार नाही.

संकलक – श्री. सुनील घनवट, राज्य संघटक, महाराष्ट्र व छत्तीसगड, हिंदु जनजागृती समिती , (संपर्क : 70203 83264)

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button