नांदेड | “मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, मुलगी घडवा!” या संदेशासह जवळा देशमुख येथील बालिकांनी राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गावभर रॅली काढून समाजाला जागं केलं. हातात घोषणाफलक, ओठांवर ठाम घोषणा आणि डोळ्यांत आत्मविश्वास घेऊन या चिमुकल्या बालिकांनी अन्यायाविरोधात आणि समानतेसाठी ‘नवा एल्गार’ पुकारला.


भारतामध्ये दरवर्षी २४ जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो. मुलींना शिक्षण, आरोग्य, सन्मान आणि समान अधिकार मिळावेत, तसेच समाजातील लैंगिक भेदभाव नष्ट व्हावा, या उद्देशाने हा दिवस पाळला जातो.

या निमित्ताने जवळा देशमुख येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व इयत्तांच्या मुलींनी रॅलीत सहभाग घेतला. “सेव्ह द गर्ल”, “मुलगा–मुलगी समान”, “शिक्षण हाच खरा दागिना”, “स्त्री भ्रूणहत्या बंद करा” अशा ठळक घोषणा गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेत होत्या.


जिल्ह्यात ३ ते २६ जानेवारी या कालावधीत ‘लेक वाचवा – लेक शिकवा’ अभियान राबविण्यात येत असून, त्या अंतर्गत हा उपक्रम घेण्यात आला. रॅलीदरम्यान मुलींना त्यांच्या हक्कांबाबत, शिक्षणाचे महत्त्व, आरोग्य व पोषण तसेच लैंगिक असमानता व शोषणाविरोधात जनजागृती करण्यात आली.


या उपक्रमात मुख्याध्यापक जी. एस. ढवळे, विषय शिक्षक उमाकांत बेंबडे, सहशिक्षक संतोष घटकार, मारोती चक्रधर, मनिषा गच्चे यांनी पुढाकार घेत मार्गदर्शन केले. शिक्षकांनी दिलेल्या संदेशामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीव दिसून आली.
रॅलीदरम्यान गावातील नवसाक्षर नागरिकांनीही घोषणाफलक वाचून माहिती घेतली. “आजच्या अतिसंवेदनशील काळात सेव्ह द गर्ल हा नारा केवळ घोषणापुरता न राहता तो प्रत्येकाच्या मनात रुजला पाहिजे,” अशी भावना शिक्षकांनी व्यक्त केली. बालकन्यांच्या या जागरूक प्रयत्नांनी गावात सकारात्मक संदेश पोहोचवला असून, समाज बदलाची सुरुवात लहान पावलांतूनच होते, हेच या रॅलीतून अधोरेखित झाले.

