किनवट, परमेश्वर पेशवे l सरपंच संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक बोधडी बुद्रुक येथील अंध विद्यालयात सरपंच पंडित व्यवहारे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी संपन्न झाली असून या बैठकीत संघटनेची नुतन तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली. सरपंच संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी बोधडी बु चे सरपंच सरपंच बालाजी भिसे यांची तर उपाध्यक्षपदी धानोरा ग्रामपंचायतचे सरपंच निलेश कुमरे यांची एकमताने निवड करण्यात आली.


किनवट तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन तालुका कार्यकारणी गठीत करण्याच्या अनुषंगाने 11 फेब्रुवारी रोजी बोधडी बु येथील अंध विद्यालयात सरपंचांची बैठक घेण्यात आली.

या बैठकीत सांगोपांग चर्चा करून नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. सरपंच संघटनेच्या किनवट तालुकाध्यक्षपदी बोधडी बु ग्रामपंचायतचे सरपंच बालाजी रामराव भिसे, तालुका उपाध्यक्षपदी निलेश कुमरे व स्वप्नील राठोड, कोषाध्यक्षपदी संदीप पानपत्ते, सह कोषाध्यक्ष म्हणून वसंतराव कुडमते, सचिवपदी शिवाजी भुरके, सहसचिवपदी राजाराम कोवे, सदस्य पंडित व्यवहारे, सूर्यभान सिडाम व शशांक कनाके यांची निवड करण्यात आली आहे. या बैठकीत सरपंचांच्या अडीअडचणी तसेच शासन दरबारी प्रलंबित असलेल्या अनेक प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीला किनवट तालुक्यातील जवळपास 60 गावचे सरपंच उपस्थित होते.

सरपंच हा गावाचा प्रमुख व प्रथम नागरिक असला तरी बऱ्याच वेळा प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्याकडून त्यांच्या हक्क आणि अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न केला जातो.गावातील विकास कामासंदर्भात सरपंचांनी केलेल्या मागण्या व सूचना ग्राह्य धरल्या जात नाहीत.

काही खाजगी गुत्तेदार परस्पर कामे मंजूर करून निधी उचलण्यासाठी सरपंचावर दबाव टाकतात हा प्रकार थांबविण्यासाठी शासनाने कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे.गावातील सर्व कामे सरपंचांच्या नियंत्रणाखाली झाली पाहिजेत. सरपंचांना दिले जाणारे मानधन हे अत्यंत तुटपुंजे असून आमदार खासदाराप्रमाणे सरपंचानाही स्वतंत्र निधी द्यावा तसेच इतर सोयी सुविधा द्याव्यात.
तालुकास्तरावर सरपंचांना निवासाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी सरपंच भवन उभारण्यात यावे अशा सरपंच संघटनेच्या मागण्या असून यासाठी मी संघटनेच्या मार्फत शासनस्तरावर पाठपुरावा करेन अशा प्रतिक्रिया सरपंच बालाजी भिसे यांनी निवडीनंतर दिल्या आहेत.