नांदेड। रेल्वे प्रशासनाशी संबंधीत अनेक समस्यांबाबत नेहमी ओरड असली तरी काही वेळा रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशाच्या तक्रारीची दखल घेत सोडवणूकही केली जाते असा अनुभव नांदेडच्या एका महिला प्रवाशाला आला आहे. मराठवाडा एक्स्प्रेसच्या वातानुकुलीत डब्ब्यात छत्रपती संभाजीनगर औरंगाबादला विसरलेली बॅग परतीच्या प्रवासात पुन्हा त्याच रेल्वेस्थानकावर संबंधीत प्रवाशास जशास तशी परत मिळाल्याने रेल्वे प्रशासनाच्या या सेवेबाबत सुखद अनुभव आला आहे.
नांदेडच्या रहिवासी सौ.अंजली गिरीश बाऱ्हाळे या सध्या नोकरीनिमित्त छत्रपती संभाजीनगरला भाग्यलक्ष्मी बँकेत कार्यरत आहेत. काही दिवसांच्या सुटीनंतर त्या दि. १७ डिसेंबर रोजी सकाळी नांदेडहून गाडी क्रमांक १७६८८ मराठवाडा एक्स्प्रेसच्या सी २/५२ या वातानुकुलीत डब्यातून छत्रपती संभाजीनगर औरंगाबादला रवाना झाल्या. छत्रपती संभाजीनगर औरंगाबादला सकाळी १० च्या सुमारास उतरताना त्यांची एक बॅग याच डब्ब्यात दरवाजाजवळील एका आसनावर विसरुन राहिली.
गर्दीमुळे त्या कशाबशा उतरल्या आणि बँकेकडे कर्तव्यावर रवाना झाल्या. काही वेळानंतर त्यांना आपली १ बॅग याच डब्ब्यात विसरुन राहिल्याचे लक्षात आले. त्यांनी नांदेडला कृष्णा उमरीकर यांना भ्रमणध्वनीवरुन ही माहिती दिली. प्रवासाचे डिटेल्स मागवून उमरीकर यांनी दमरे नांदेड विभागाचे जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला. त्यांना प्रवाशाचे व ऑनलाईन तक्रारीचेही तपशील दिले.
काही वेळातच शिंदे यांनी आपल्या यंत्रणेमार्फत संबंधीत रवी यांच्याशी संपर्क साधून माहिती दिल्यावर ती बॅग जेथे होती तेथेच असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी पुढील कार्यवाही करुन ती बॅग सुरक्षित असल्याचे सांगितले. मराठवाडा एक्स्प्रेसच्या त्या डब्ब्यातील रेल्वे कर्मचारी रवी यांच्याकडून ही बॅग मंगळवारी दि. १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.४५ वाजता सौ.अंजली गिरीश बाऱ्हाळे यांना जशास तशी परत मिळाल्याने बाऱ्हाळे यांनी रेल्वे प्रशासन व जनसंपर्क विभागाच्या तत्परतेचे कौतुक केले आहे.