नांदेड, अनिल मादसवार| नांदेड परिक्षेत्रात पोलीस विभागाने ‘अवैध व्यवसाय विरोधी अभियान -१’ सुरु केले असून, पहिल्या आठवडयात सुमारे 400 कारवाया करून तब्बल 1 कोटीहून अधिक रकमेचा मुद्येमाल जप्त केला आहे. हि कार्यवाही दिनांक १ मे ते ३१ मे, 2025 दरम्यान, नांदेड परिक्षेत्रात ‘अवैध व्यवसाय विरोधी अभियान-१’ चे अंतर्गत करण्यात आले आहे.


नांदेड परिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध दारू, मटका, जुगार, ऑनलाइन लॉटरी, क्रिकेट बॅटिंग, गुटखा, अंमली पदार्थ, वेश्याव्यवसाय, वाळू उपसा व वाहतूक, अवैध प्रवासी वाहतूक इत्यादींना आळा घालण्याकामी व्यापक मोहिमेची आवश्यकता लक्षात घेऊन, दिनांक १ मे पासून म्हणजे महाराष्ट्र दिनापासून परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांत ‘ अवैध व्यवसाय विरोधी अभियान-1’ चे आयोजन करण्यात आले आहे.


सदर मोहिमेत, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, अंमलदार यांचेसह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व अपर पोलीस अधीक्षक हे सहभागी झाले आहेत. त्याचप्रमाणे, स्थानिक गुन्हे शाखा व विशेष पोलीस पथके ही देखील कारवाईत सहभागी झाली असुन, संबंधित जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी अवैध व्यवसाय विरोधी कारवायांवर सक्तीने देखरेख ठेवली आहे.



या अनुषंगाने दि.01.05.2025 ते दि.07.05.2025 पावेतो नांदेड परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर या चारही जिल्हयांत अवैध व्यवसायांविरोधात मटका/ जुगार, गांजा, अवैध दारु , वाळू व इतर संबधाने खालील प्रमाणे कारवाया करण्यात आल्या आहेत.

अ.क्र. जिल्हा एकुण केसेस आरोपी संख्या जप्त मुद्येमाल
1 नांदेड 97 98 6,05,478
2 परभणी 106 110 60,19,810
3 हिंगोली 102 102 34,26,590
4 लातूर 89 91 20,22,205
एकूण 394 401 1,20,74,083
चालू महिन्यात दिनांक 01.05.2025 ते दिनांक 07.05.2025 पावेतो परिक्षेत्रात अवैध व्यावसायिकांचे विरुद्ध वरीलप्रमाणे एकूण (394) केसेस करण्यात आल्या असून एकूण 1,20,74,083 /- रुपयांचा मुद्येमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांनी पोस्टे हटटा हद्यीमध्ये गांजाची लागवड व साठवणूक विरोधात कारवाई करुन 87,000/- रुपयाचा मुद्येमाल जप्त केला आहे.त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा , परभणी यांनी देखील पोस्टे गंगाखेड परिसरातुन 95,000/- रुपयांचा गांजा जप्त करुन चांगली कामगिरी केली आहे. उपरोक्त कामगिरीबाबत पोलीस उप महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
सदर मोहिमेदरम्यान, सातत्याने अवैध व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध तडीपार, एम.पी.डी.ए. व प्रकरण परत्वे मोक्का कायद्याखाली देखील कारवाई करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या असून, सद्या अशा व्यक्तीविरुध्दचे गुन्हे अभिलेख पडताळणीचे काम सुरु आहे.
आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती, नागरिकांनी नजीकच्या पोलीस ठाण्यास अथवा पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाच्या nandedrange.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर कळवून अशा अवैध व्यवसायांचा बिमोड करण्यासाठी आपला हातभार लावावा, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी केले आहे.


