नांदेड| “सायकल हा केवळ प्रवासाचा मार्ग नसून तो आरोग्याचे साधन, पर्यावरणाचे रक्षण आणि आर्थिक दृष्ट्या शाश्वत पर्याय आहे. आपल्या नांदेड जिल्ह्यात सायकल संस्कृती ही आरोग्य आणि शिस्तीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. नांदेड ते अयोध्या असा सायकल प्रवास करणाऱ्या पथकाला त्यांनी शुभेच्छा दिल्या.


‘शौर्यभूमी ते भक्तीभूमी’ या आरोग्य संदेश सायकल यात्रेचा शुभारंभ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. या यात्रेतून आरोग्य संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला जाणार आहे. नांदेड ते अयोध्या असा दीर्घ प्रवास करताना सायकलस्वार विविध गावांमध्ये आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरणाबाबत जनजागृती करणार आहेत.

सायकलविषयी काही रोचक गोष्टी
1817 साली जर्मनीतील कार्ल व्हॉन ड्रायस यांनी पहिली दोन चाकांची “लॉफ मशीन” (Running Machine) तयार केली, जी आधुनिक सायकलीची सुरुवात मानली जाते.
1884–1886 या काळात अमेरिकन सायकलिस्ट थॉमस स्टीव्हन्स यांनी जगभर सायकलवर प्रवास केला, त्यात भारताचा समावेश होता. भारतातील डॉ. विरेंद्र सिंग यांनी 1980–90 च्या दशकात एक लाख किलोमीटर पेक्षा जास्त सायकल प्रवास करून विक्रम प्रस्थापित केला.


या प्रसंगी सुभाष निलावार (मुद्रण जिल्हाधिकारी), अमोल इंगळे (उद्योग महाव्यवस्थापक, नांदेड), डॉ. देवेंद्र पालीवाल (अध्यक्ष, नांदेड सायकलिस्ट), संतोष देवडे (सह दुय्यम निबंधक, भोकर), परमेश्वर बिरादार (सह दुय्यम निबंधक, नांदेड), प्रीतम कंदी (आर्किटेक्ट), कौस्तुभ फरांदे (डायरेक्टर, जैन फरांदे ग्रुप), डॉ. सचिन आन्नेवार,अर्पित फलोर ,दीपक कल्याणकर, गजानन बोटलवार, शंतनू दळवी, साई गडगुले, भगवाजी पवार, गंगाधर पवार, गौतम नागडा आदी मान्यवर उपस्थित होते.

विशेष म्हणजे, नांदेडचे प्रमोद रघुनाथ गडगुले, यशवंत दत्तराव तवर आणि संदीप माधवराव लंगडे या तिघांनीही नांदेड ते अयोध्या असा ११५१ किलोमीटरचा सायकल प्रवास सुरू करून या मोहिमेत आपला सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यांचा हा प्रयत्न नांदेडकरांसाठी अभिमानाचा आणि प्रेरणादायी ठरत आहे.

