नांदेड| वाहनधारक व चालकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक वाढू लागल्याने परिवहन विभागाने नागरिकांना बनावट वेबसाइट्स, संशयास्पद मोबाईल ॲप्स आणि खोट्या ई-चालान लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.


ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी आणि ई-चालान सेवांच्या नावाखाली काही फसवणूक करणारे बनावट SMS किंवा WhatsApp वरून “चलन बाकी आहे”, “परवाना निलंबित होणार” अशा धमकीपर संदेशांसह अनधिकृत पेमेंट लिंक पाठवून नागरिकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहेत. परिवहन विभागाने स्पष्ट केले की RTओ किंवा परिवहन विभाग कधीही WhatsApp वर पेमेंट लिंक पाठवत नाही, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.

बनावट APK फाइल्सपासून धोका
“RTO Services.apk”, “mParivahan_Update.apk”, “eChallan Pay.apk” अशा संशयास्पद एपीके फाईल्स डाउनलोड केल्यास मोबाईलमधील OTP, बँकिंग डिटेल्स आणि वैयक्तिक माहिती चोरी जाण्याचा गंभीर धोका असल्याचे विभागाने सांगितले आहे.


फक्त अधिकृत सरकारी संकेतस्थळांचा वापर करावा
वाहनधारकांनी खालील gov.in डोमेनवरील अधिकृत संकेतस्थळांचा उपयोग करावा— वाहन सेवा (VAHAN): https://vahan.parivahan.gov.in सारथी सेवा (SARATHI): https://sarathi.parivahan.gov.in परिवहन सेवा पोर्टल: https://www.parivahan.gov.in ई-चालान पोर्टल: https://echallan.parivahan.gov.in.gov.in व्यतिरिक्त .com, .online, .site, .in किंवा इतर डोमेनवरील वेबसाइटवर वैयक्तिक माहिती किंवा पेमेंट करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

फसवणुकीचा संशय वाटल्यास त्वरित तक्रार करा
संशयास्पद लिंक किंवा संदेश मिळाल्यास नागरिकांनी त्वरित— नॅशनल सायबर क्राईम पोर्टल: https://www.cybercrime.gov.in सायबर फसवणूक हेल्पलाइन: 1930 जवळचे जिल्हा सायबर पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत कंकरेज यांनी केले. नागरिकांनी सतर्क राहून योग्य माहितीची पडताळणी करणे अत्यंत आवश्यक असल्याचे परिवहन विभागाने नमूद केले आहे.

