हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) आज दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळेतील पहिल्या दिवसाच्या स्मरणार्थ विद्यार्थी दिवस म्हणून विशेष कार्यक्रमाचे आयोजन अंगणवाडी केंद्रात करण्यात आले.


कार्यक्रमात हिमायतनगर येथील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान एसबीआय बँकेचे शाखा व्यवस्थापक गौरव सोनवणे सर यांनी भूषविले. त्यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी मार्गदर्शनपर भाषण करत समाजउन्नतीत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.



कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सौ. छाया संदीप उमरे यांनी केले, तर सौ. ज्योती पाठक मॅडम यांनी सेविका वर्गाला मार्गदर्शन केले. त्यानंतर सेविका व मदतनीस यांचे चर्चा सत्र पार पडले, ज्यामध्ये विविध शासकीय कामकाजासंबंधी मुद्द्यांवर संवाद झाला. कार्यक्रमानंतर दुपारच्या भोजनामध्ये खिचडी, जलेबी व केळी यांचा प्रसाद सौ. छाया संदीप उमरे यांच्या सौजन्याने देण्यात आला.



हा उपक्रम अंगणवाडी केंद्र क्र. १३, हिमायतनगर (पशुवैद्यकीय दवाखाना परिसर) येथे पार पडला. एसबीआय बँकेचे व्यवस्थापक गौरव सोनवणे सर यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिक वाढली. सेविका व मदतनीस यांची चर्चा फलदायी ठरून त्यांच्या विविध अडचणींवर उपाय सुचविण्यात आले. कार्यक्रम अत्यंत उत्साह, ऐक्य आणि देशभक्तीच्या वातावरणात यशस्वीपणे पार पडला.



