नांदेड| 12 वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून छत्रपती संभाजीनगर येथे पळवून नेले होते. या घटनेच्या २४ तासाच्या आता पोलिसांनी सायबरच्या मदतीने शोध घेऊन आरोपीसह मुलीला परत आणले आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी गुन्हे बैठकीत मिशन निर्भया अंतर्गत अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलींचा शोध घेणे बाबत सर्व पोस्टे प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते. त्या अनुषंगाने विमानतळ ठाणे अंतर्गत 12 वर्षीय अल्पवयीन मुलीस आरोपी नामे ओमकार मारोती पानपट्टे, याने दिनांक 14 जुलै 2025 रोजी सकाळी 11.00 वाजेच्या सुमारास जिजामाता हायस्कुल, गांधीनगर नांदेड येथुन फूस लावून पळवून नेले होते.


या गुन्हयाचा तपासासाठी विमानतळ पोलीस पथकाने तात्काळ तपासाची चक्रे फिरवून आरोपीचे मोबाईलचे सायबर विभागाचे मदतीने लोकेशन हस्तगत केले. छत्रपती संभाजीनगर लोकेशन दाखवल्याने तात्काळ विमानतळ पोलीसांचे पथक सदर ठिकाणी जावुन 24 तासाचे आत आरोपी व अल्पवयीन मुलीस ताब्यात घेवून त्यांना पोलीस स्टेशन येथे आणले. तसेच अल्पवयीन मुलीस सुरक्षितरित्या तिचे पालकांचे ताब्यात देवून आरोपीवर कायदेशीर कारवाई केली. सदरची कामगिरी करणारे पोलीस स्टेशन विमानतळ येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.




