मुंबई| चालू खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी केवळ डीएपी (Di-Ammonium Phosphate) खतावरच अवलंबून न राहता बाजारात उपलब्ध असलेल्या पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना करण्यात येत आहे.
महाराष्ट्र हे मृद परिक्षण व जमीन आरोग्य पत्रिकांचे आधारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणाली वापराकरिता अग्रेसर आहे. राज्यामध्ये सध्या पेरणीला सुरुवात झाली असून डीएपी खताची शेतकऱ्यांकडून जास्त मागणी आहे. डीएपी खतामध्ये 18 टक्के नत्र तर 46 टक्के स्फुरद ही अन्नद्रव्य आहेत.
डीएपी खताची कमतरता भरुन काढण्यासाठी पर्यायी खत वापरणे गरजेचे आहे. स्फुरद युक्त खतामध्ये डीएपी खतानंतर एसएसपी (Single Super Phosphate) या खताची सर्वाधिक मागणी आहे. एसएसपी खत हे देशातंर्गत तयार होत असून यामध्ये स्फुरद-16 टक्के सह सल्फर व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये आढळून येतात. सल्फर अन्नद्रव्यामुळे तेलबिया पिकांमध्ये एसएसपी खताचा वापर फायदेशीर ठरणार आहे. डीएपी खताच्या एका गोणी ऐवजी युरिया अर्धी गोणी व एसएसपी तीन गोणी खतांचा वापर डीएपी खतास चांगला पर्याय आहे.
एसएसपी बरोबरच संयुक्त खते जसे की एनपीके-10:26:26, एनपीके-20:20:0:13, एनपीके-12:32:16 व एनपीके-15:15:15 या खतांच्या वापरामुळे नत्र व स्फुरद बरोबरच पालाश हे अन्नद्रव्य सुद्धा पिकांना उपलब्ध होते. त्यामुळे या संयुक्त खतांचा वापर केल्यास पिकांसाठी पोषक ठरतो. त्याचबरोबर टिएसपी (Tripple Super Phosphate) या खतामध्ये 46 टक्के स्फुरद अन्नद्रव्याची मात्रा असून डीएपी खताच्या एका गोणी ऐवजी युरिया अर्धी गोणी व टीएसपी एक गोणी खतांचा वापर केल्यास तो देखिल डीएपी खतास उत्तम पर्याय आहे.