नांदेड l येथील संगीत शंकरदरबार घ्या दुस-या दिवसाच्या प्रथम सत्राची सुरूवात उदयोन्मुख युवा गायक आदित्य मोडक यांच्या गायनाने झाली.

ग्वाल्हेर घराण्याचे आघाडीचे गायक व गुरु डॉ. पं. राम देशपांडे यांचे शिष्य असलेले आदित्य मोडक आकाशवाणीवरील ‘अ’ श्रेणीचे कलाकार असून कर्नाटकातील धारवाड येथील ‘पंचाक्षरी गवाई पुरस्काराने नुकतेच सन्मानित झालेले आहेत.
त्यांनी आपल्या गायनाची सुरूवात मुलतानी रागाने केली. “गोकूल गावत छोरा ” या विलंबीत ख्यालात त्यांनी संथ आलापीने राग विस्तार करीत रसिकांना मुलतानीच्या दालनातून फिरवून आणले.

निसर्गदत्त आवाज त्या जोडीला स्वरांवर घेतलेली मेहनत त्यांच्या सादरीकरणातून दिसून येत होती. “नैननमे आनबान” या दृत तालातील तानक्रिया विलक्षण सुखावणारी होती.भिन्नषड्ज रागातील “बोलावा विठ्ठल ” अभंग गावून त्यांनी सेवा संपविली
त्यांना होर्मोनियम साथ स्थानिक गुणी कलावंत अभिनव रवंदे यांनी तर तबला संगत स्वप्निल भिसे यांची होती.प्रारंभी कलावंताचे स्वागत नरेंद्र चव्हाण,गिरीष देशमुख यांनी केले.



