श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| दि.२१ नोव्हेंबर रोजी पोलीस स्टेशन माहुर हद्दीत डोंगराळ भागात असलेल्या मौजे पाचोंदा येथे मयत नामे अंतकलाबाई अशोक अडागळे वय ५५ वर्ष व अनुसयाबाई साहेबराव अडागळे वय ५० वर्ष या दोघी शेतात कापुस वेचणी करीत असतांना कोणीतरी अज्ञात इसमाने त्या दोघींचा गळा दाबुन जिवे मारुन त्यांच्या अंगावरील सोन्याचे व चांदीचे दागिणे असा मुद्देमाल चोरुन नेले बाबत पोलीस स्टेशन माहुर येथे नमुद प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.



सदर गुन्हयाचे गांभीर्य पाहता अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, अर्चना पाटील अपर पोलीस अधीक्षक भोकर, किरण भोंडवे उप विभागीय पोलीस अधिकारी माहुर, उदय खंडेराय पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नांदेड, पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी घटनास्थळी भेट देवुन तात्काळ गुन्हा उघडकिस आणण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना योग्य त्या सुचना देण्यात आल्या होत्या. आरोपी शोध कामी स्थानिक गुन्हे शाखा नांदेड येथील चार टीम नेमुन एक टीम अदिलाबाद व एक टीम यवतमाळ तसेच दोन टीम उप विभाग माहुर व किनवट येथे पाठविण्यात आल्या होत्या. तसेच आरोपी शोध कामी साक्षीदार यांचे कडुन तात्काळ माहीती हस्तगत करुन संशयीत आरोपीचे व्हिडीओ कॉलींगव्दारे पुणे येथुन तज्ञाव्दारे स्केच तयार करण्यात आले.


त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक रवि वाहुळे, पो.उप. निरीक्षक नागनाथ तुकडे व त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार असे वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आरोपींचा किनवट व माहुर उपविभाग येथे शोध घेत होते, तसेच संशयीत आरोपीचे स्केच वरुन आरोपीची माहिती घेत असतांना दिनांक 21. रोजी रवि वाहुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, संशयीत आरोपी नामे दत्ता सुरेश लिंगलवार, रा. सदोबा सावळी ता. आर्णी जि. यवतमाळ हा गंगाजी नगर, सेलु करंजी ता. माहुर जि. नांदेड येथील त्याचे नातेवाईकाच्या शेतातील अखाडयावर लपुन बसला आहे. अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने सदरची माहीती वरीष्ठांना कळवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली रवि वाहुळे, पो.उप. निरीक्षक नागनाथ तुकडे, ज्ञानोबा कवठेकर व त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार हे मिळालेल्या माहीतीच्या ठिकाणी जावुन सापळा लावुन आरोपीस ताब्यात घेवुन त्याचे नाव गाव विचारले.


त्याने त्याचे नाव दत्ता सुरेश लिंगलवार वय 38 वर्ष व्यवसाय बेकार रा. सदोबा सावळी ता. आर्णी जि. यवतमाळ असे असल्याचे सांगितले. त्यास अधिक विश्वासात घेवुन सखोल विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचा मित्र गजानन गंगाराम येरजवार वय 41 वर्ष व्यवसाय सुतारकाम रा. गंगाजीनगर, करंर्जी ता. माहुर जि. नांदेड यांनी दोघांनी मिळून केल्याचे सांगितले. वरुन आरोपी दत्ता लिंगलवार यास दुसऱ्या आरोपी गजानन हा कोठे राहतो या बाबत विचारपुस केली असता त्यांनी गावाच्या खाली सगळ्यात शेवटी राहतो असे सांगुन त्याचे घरी घेवुन गेला असता दुसरा आरोपी गजानन येरजवार हा सुध्दा मिळुन आला त्यास विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.

त्यांनी गुन्हयात वापरलेली एक मोटार सायकल व दोन मोबाईल गुन्हयाचे तपास कामी ताब्यात घेण्यात आले आहेत. दि.२१ नोव्हेबर रोजी मयताचे शवविच्छेदन माहूर येथील वैद्यकीय अधीक्षक किरणकुमार वाघमारे. डॉ बिपान बाभळे. डॉ मंगेश नागरगोजे. यांनी तब्बल ४ तास शवविच्छेदन केले असून तब्बल २४ तासांच्या नंतर त्या दोन महीलांवर त्यांच्या मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
“मुद्देमाल व आरोपींना आम्हाला दाखवा अन्यथा मृतदेह” ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईक यांनी घेतला होता त्यामुळे काही काळ ग्रामीण रुग्णालय परीसरात तणाव निर्माण झाला होता परंतु किनवट येथिल पोलिस निरीक्षक गणेश कराड यांनी त्यांच्या नातेवाईकांची समजुत काढण्यात आल्याने नातेवाईक यांनी मृतदेह ताब्यात घेतले.


