किनवट, परमेश्वर पेशवे। शेतात बांधलेल्या बैलावर वन्य प्राण्यांनी हल्ला करून बैल ठार केल्याची घटना गुरुवारी 11 जुलै 2024 रोजी उघडकीस आल्याने रिठा येथील शेतकरी सुरेश गणपत कांबळे यांनी इस्लापूर येथील वन परिक्षेत्र कार्यालयाकडे वन्य प्राण्याच्या हल्ल्यात बैल ठार झाल्याची तक्रार 12 जुलै 2024 रोजी केली आहे.


किनवट तालुक्यातील रिठा येथील शेतकरी सुरेश गणपत कांबळे वय 50 वर्षे धंदा शेती हा शेतकरी 9 जुलै 2024 रोजी मंगळवारी जंगलालगत असलेल्या शेतीमध्ये बैल चारून शेतात बैल बांधून घराकडे जेवण करण्यासाठी गेला होता आणि पुन्हा चार वाजल्याच्या सुमारास बैल चारण्यासाठी शेताकडे आला असता दोन्हीही बैल बांधलेल्या ठिकाणी आढळून आले नसल्याने त्यांनी दोन्ही बैलांचा शोध घेतला मात्र दोन्ही बैल आढळले नाही आणि सायंकाळची वेळ झाल्याने तो पुन्हा घराकडे परत आला त्यावेळेस त्यातील एक बैल घरी आल्याचे दिसले.


सदरील गायब झालेल्या बैलाचा शोध घेण्यासाठी शेता शेजारील लोकांकडे विचारणा केली पण बैल कुठेही मिळून आला नाही सलग दोन दिवस जंगलामध्ये शोध घेतला असता गुरुवारी 11 जुलै 2024 रोजी बैल मृत्त अवस्थेत व बैलाचा काही भाग फस्त केलेल्या अवस्थेतच जंगलातच आढळून आल्याने सदरील घटनेची माहिती वन कर्मचाऱ्याला दिल्याने वनपाल दिपाली सोनाले यांनी मृत्त बैलाचा पंचनामा केला.

सुरेश गणपत काबंळे या शेतकऱ्यांनी वन्य प्राण्यांच्या हल्यात बैल ठार झाल्याची तक्रार इस्लापूर येथील वनपरिक्षेत्र कार्यालय येथे देऊन ऑनलाईन तक्रार वनविभागाकडे केली आहे. ऐन कोळपणीच्या मौसमा मध्येच वन्य प्राण्याकडून बैल ठार झाल्याने हा शेतकरी अडचणीत सापडला आहे.
