मराठवाड्यासाठी यंदाची विधानसभा निवडणूक खूप वेगळी आहे . लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभेची निवडणूक वेगवेगळ्या मुद्द्यावर लढविली जाते. तसे पाहिले तर मराठवाड्यासाठी महायुतीने भरभरून योजना दिल्या. त्या योजनांची उतराई करण्यासाठी मराठवाड्यातील मतदार महायुतीच्या बाजूने उभा राहतो की पुन्हा लोकसभेप्रमाणे महाविकास आघाडीच्या पारड्यात मते जातील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
प्रामुख्याने महायुती व महाविकास आघाडी या दोघांमध्ये राज्यात लढत होत आहे . प्रत्यक्षात मात्र मराठवाड्यात सहा पक्षाचे वेगवेगळे उमेदवार, बंडखोर तसेच इतर अपक्ष व अन्य छोट्या-मोठ्या पक्षांच्या उमेदवारांच्या लढती लक्षवेधक आहेत . लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात भाजपला म्हणावी तशी साथ मतदारांकडून मिळाली नाही. त्यावेळची परिस्थिती व सध्याच्या विधानसभा निवडणुकीतील परिस्थिती खूप वेगळी आहे. त्यामुळे विधानसभेत मराठवाडा कोणाच्या बाजूने उभे राहील यावर मराठवाड्यातील मतदारांची निष्ठाच राजकीय पक्ष तपासणार आहेत, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी , गृहमंत्री अमित शहा तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार यांनी देखील मराठवाड्यात विविध ठिकाणी सभा घेतल्या. महायुतीतर्फे घेतलेल्या जाहीर सभेत मराठवाड्यातील पाणी प्रश्न सोडविणार असल्याची ग्वाही अनेक नेत्यांनी दिली.
मराठवाड्याच्या दृष्टीने ही खूप समाधानकारक बाब मानता येईल. देशाच्या पंतप्रधानांपासून राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वच नेत्यांनी मराठवाड्याच्या कळीच्या मुद्द्यावर हात घातला . येथील मतदारांना भावनिक साद घातली. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विकासाच्या बाबी कमी परंतु एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी जास्त झाडण्यात आल्या. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधानांपासून उपमुख्यमंत्र्यांपर्यंत तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीतही अनेकदा खालच्या पातळीवरची टीका केली.परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन सभा मराठवाड्यासाठी फलदायी ठरतील असे चित्र दिसत आहे. मराठवाड्यासाठीचा वॉटर ग्रीड प्रकल्प मार्गी लावल्याचे पंतप्रधानांनी जाहीर सभेत सांगितले . त्या पाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या प्रकल्पामुळे मराठवाडा सुजलाम सुफलाम होईल , अशी ग्वाही दिली. मराठवाड्यातील पाणी प्रश्नासाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे.
वैतरणा आणि उल्हास खोर्यातून ५४.७० टीएमसी पाणी मिळणार असल्याचे सत्ताधार्यांकडून सांगितले जात आहे. दुसरीकडे काँग्रेसचे राहुल गांधी तसेच अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी विकासात्मक मुद्द्यावर बोलण्याऐवजी केवळ सत्ताधारी व पंतप्रधानांवर टीका करण्यात मोठेपणा समजला. कर्नाटक व तेलंगणा प्रमाणे महाराष्ट्रातही महालक्ष्मी योजनेद्वारे महिलांना दर महिना ३००० रुपये देण्याची घोषणा काँग्रेसने केली. तसेच बेरोजगारांना नोकरी देण्याचे आश्वासनही दिले. अडीच लाख तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊ , अशी ग्वाही काँग्रेसचे राहुल गांधी यांनी मराठवाड्यातील सभांमध्ये दिली. एकीकडे लोकसभा निवडणुकीत बसलेला फटका व झालेली पीछेहाट भरून काढण्यासाठी महायुती प्रयत्नशील आहे . तर लोकसभेमध्ये मतदारांनी महाविकास आघाडीला दिलेली पसंती यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कायम राहील का ? याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष आहे.
मराठवाड्यातील मतदारांची निष्ठा कोणाकडे आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. लोकसभा निवडणुकीच्या काळात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी मतदारांची मानसिकता वेगळीच बनविली होती. परंतु आता मराठवाड्यात तो फॅक्टर विधानसभा निवडणुकीपुरता तरी संपल्यात जमा आहे . त्यामुळे मतदार मतदान करत असताना लोकसभा निवडणुकीची मानसिकता ठेवणार नाहीत , असे चित्र दिसून येत आहे. विकासाच्या मुद्द्यावर तसेच उमेदवाराच्या चेहरा पाहून यंदाची विधानसभा निवडणूक मराठवाड्यात तरी काम करेल, असे मानले जात आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथे मतदार कोणाच्या बाजूने उभे राहतील , याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या ठिकाणी हिंदू जिंकणार की मुस्लिम याबद्दल सर्वच मतदारांच्या मनात धाकधूक आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना ,परभणी, हिंगोली ,नांदेड, बीड ,धाराशिव, लातूर या सर्वच जिल्ह्यात तुल्यबळ लढती होत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती संभाजीनगर येथे झालेली सभा मराठवाड्यासाठी विकासाची नांदी देणारी ठरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षवेधी सभा एमआयएमची हवा काढण्यासाठी पुरेशी ठरली. या ठिकाणी हिंदू विरुद्ध मुस्लिम असे वातावरण तापलेले आहे. याबरोबरच मराठवाड्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना की उद्धव ठाकरे यांची शिवसेना खरी आहे ,याचाही निकाल मतदार देतील. छत्रपती संभाजी नगरात कोण वरचढ राहील ? हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. बीड ,धाराशिव तसेच हिंगोली जिल्ह्यात मतदारांची पसंती भाजपला राहणार की शरद पवारांसोबत ? याकडे मराठवाड्याचे लक्ष लागले आहे. याबरोबरच उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कोणती शिवसेना जास्त मते घेईल हे देखील या निवडणूकीतून ठरणार आहे. मराठवाड्यात काँग्रेसची असलेली स्थितीही विधानसभेची निवडणूक अधोरेखित करणार आहे.
मराठवाड्यातील ४८ जागांवर २०१४ व २०१९ मध्ये भाजपचे आमदार सर्वात जास्त होते. २०१४ मध्ये भाजपचे मराठवाड्यात १५ आमदार होते. तर २०१९ मध्ये भाजपचे १६ आमदार होते. त्या पाठोपाठ २०१४ मध्ये शिवसेनेचे ११ व नंतर २०१९ मध्ये शिवसेनेचे १२ आमदार होते. त्यानंतर काँग्रेसचे नऊ व आठ , राष्ट्रवादीचे आठ व पुन्हा २०१९ मध्ये आठ, एम आय एम चा २०१४ मध्ये एकमेव आमदार होता. त्यानंतर शेकाप, रासप या दोन्ही पक्षाचे एकेक आमदार २०१९ मध्ये मराठवाड्यातून निवडून आले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र ३५ विधानसभा मतदारसंघात महायुतीचे मताधिक्य घटले. यामागे विविध कारणे आहेत. असे असले तरी, मराठवाड्यातील सर्व पक्षातील तसेच अपक्षांचे , बंडखोरांचे भवितव्य २० नोव्हेंबर रोजी ठरणार आहे.
….लेखक…डॉ. अभयकुमार दांडगे, मराठवाडा वार्तापत्र
abhaydandage@gmail.com