बिलोली, गोविंद मुंडकर | बिलोली तालुक्यातील गागलेगाव शिवारात अज्ञात व्यक्तींनी शेतातील पत्र्याचा निवारा जाळल्याची गंभीर घटना घडली असून, या आगीत एका शेतकऱ्याचे सुमारे ३ लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


गागलेगाव (ता. बिलोली, जि. नांदेड) येथील रहिवासी बालाजी लक्ष्मण आरकटवाड यांच्या शिवारातील गट क्रमांक ११० मध्ये असलेल्या पत्र्याच्या शेडला दि. ११ जानेवारी २०२६ रोजी अज्ञात कारणाने आग लागली. ही आग इतकी तीव्र होती की काही वेळातच संपूर्ण निवारा जळून खाक झाला.


या आगीत शेतकामासाठी अत्यावश्यक असलेले साहित्य पूर्णपणे नष्ट झाले आहे. यामध्ये जैन कंपनीचे तुपार संच – २, ठिबक सिंचन पाइप (२ एकर), पाण्याची टाकी, वायरचे २० बंडल, ज्वारी – १ क्विंटल, लसूण व कांदे – २ क्विंटल, कोंबडे – ५, पंप, स्प्रे मशीन, चार्जिंग पिचकरी, राहण्यासाठीचा निवारा व इतर शेती उपयोगी साहित्य यांचा समावेश असून सर्व साहित्य आगीत जळून नष्ट झाले आहे.



घटनास्थळावरील छायाचित्रांमध्ये जळालेला शेड, राखेचे ढीग, जळालेल्या पत्र्याच्या भिंती, लोखंडी सांगाडे, वितळलेले वायर व काळवंडलेली शेतजमीन स्पष्टपणे दिसून येत आहे. काही ठिकाणी अजूनही जळालेल्या वस्तूंचे अवशेष पडलेले आहेत.

या घटनेबाबत शेतकरी बालाजी लक्ष्मण आरकटवाड यांनी दि. २० जानेवारी २०२६ रोजी उपविभागीय अधिकारी, बिलोली यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. या अर्जाच्या प्रती देगलूर–बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तसेच तहसीलदार बिलोली यांनाही देण्यात आल्या आहेत.
नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक मदत मिळावी, तसेच या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांकडून होत आहे. शासनाने या शेतकऱ्याला त्वरित मदतीचा हात द्यावा, अशी जोरदार मागणी व्यक्त केली जात आहे.

