हदगाव, गौतम वाठोरे| तालुक्यातील वाळकी फाटा परिसरात केदारनाथ पेट्रोल पंपाच्या पाठीमागे असलेल्या दगडाच्या खदानीत १० जानेवारी रोजी एका महिलेचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. सदर मृत महिला हदगाव तहसील कार्यालयात चपराशी पदावर कार्यरत असलेल्या कमलबाई गंगाधर क्षीरसागर (वय ५५, रा. गौतम नगर, हदगाव) असल्याचे निष्पन्न झाले होते.


सुरुवातीला आत्महत्या अथवा अज्ञात व्यक्तीकडून खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र, हदगाव पोलिसांनी केलेल्या सखोल आणि तांत्रिक तपासानंतर या प्रकरणातील धक्कादायक सत्य समोर आले असून सुनेनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने सासूचा खून केल्याचे उघड झाले आहे.

अनैतिक संबंधांना अडथळा ठरली सासू
पोलिस तपासात आरोपी सुनीता नागेश क्षीरसागर (वय ३५) हिचे तिचा प्रियकर परमेश्वर किसन वानखेडे (रा. वटफळी) याच्याशी अनैतिक संबंध असल्याचे निष्पन्न झाले. या संबंधांना सासू कमलबाई क्षीरसागर वारंवार विरोध करत असल्याने दोघांनी संगनमत करून तिचा काटा काढण्याचा कट रचला.


स्कार्फने गळा आवळून खून, मृतदेह खदानीत फेकला
आरोपींनी कमलबाई यांचा स्कार्फने गळा आवळून निर्घृण खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात भरून वाळकी फाटा येथील दगडाच्या खदानीत फेकून दिला. खून नैसर्गिक मृत्यू असल्याचा आभास निर्माण करण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

चार आरोपी अटकेत
या गुन्ह्यात अमोल लोभाजी इटकरे (रा. नागापूर, ता. उमरखेड) व अक्षय नारायण कदम (रा. निवघा बाजार) यांनीही आरोपींना मदत केल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी चारही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी हदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गजानन सुदाम बर्गे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संकेत दिघे करत आहेत.

