हिमायतनगर, अनिल मादसवार| नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्या नेतृत्वाखाली दिनांक ३० रोजी शहरातील मुख्य रस्त्यावरून भव्य पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांचं पथसंचलन करण्यात आले.


पथसंचलनादरम्यान पोलिसांच्या तैनातीमुळे शहरात दिमाखदार वातावरण निर्माण झाले होते. मोठ्या संख्येने पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत, शांततापूर्ण आणि निष्पक्ष निवडणुका पार पाडण्याचा संदेश दिला.


निवडणूक काळात कुठल्याही प्रकारचे गैरकृत्य, दहशत, दंगा किंवा बेकायदेशीर कृत्य सहन केले जाणार नाही, असे सूचक आवाहन या पथसंचलनातून करण्यात आले. मतदारांनी निर्भयपणे व शांततेत मतदान करावे, अशी विनंती पोलीस प्रशासनाच्या वतीने केली गेली. शहरात वाढविण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्तामुळे गैरप्रकार करण्याचा विचार करणाऱ्यांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली असून, निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे सुरळीत पार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



