उस्माननगर, माणिक भिसे| मागील अनेक वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या परंपरेनुसार दत्तात्रेय मठ संस्थान, उस्माननगर (मोठी लाठी), ता. कंधार यांच्या वतीने श्रीक्षेत्र माहूर शिखर पायी दिंडी सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. ही पायी दिंडी शनिवार, दि. २४ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार असून, सकाळी पूजा विधीनंतर दुपारी १२ वाजता दिंडीचे प्रस्थान होणार आहे.


ही पवित्र पदयात्रा गुरुवर्य अवधूतबन गुरु शंकरबन महाराज यांच्या हस्ते पूजा करून सुरू होणार आहे. श्री सद्गुरु कृपेने तसेच श्री १०८ महंत मोक्षवासी श्री गंभीरबन गुरु प्रसादबन महाराज, मोक्षवासी तपोनिधी संत श्री शंकरबन महाराज व श्री १०८ परमपूज्य यदुबन महंत महाराज यांच्या कृपा-आशीर्वादाने, गुरुवर्य अवधूतबन गुरु शंकरबन महाराज यांच्या दिव्य सानिध्यात आणि समस्त उस्माननगर ग्रामस्थांच्या सहकार्याने ही पदयात्रा संपन्न होणार आहे.

दत्त मंदिर मठ संस्थान, उस्माननगर येथून निघणाऱ्या या दिंडीत भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन गुरु अवधूतबन महाराज यांनी केले आहे. पदयात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सद्भक्तांनी दत्त मंदिर मठ संस्थान, उस्माननगर येथे संपर्क साधून नावनोंदणी करून घ्यावी, असेही कळविण्यात आले आहे. या पायी दिंडीदरम्यान अध्यात्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, दररोज रात्री ९ ते १२ महापूजा व भजन,
पहाटे ३ ते ६ भोपळ्या व काकडा आरती होणार आहे.


महापूजेचे पौरोहित्य दत्तभक्त परायण रमेश जगन्नाथ घोरबांड व द. भ. प. नागेश गणेशराव घोरबांड करणार आहेत. रविवार, दि. १ फेब्रुवारी रोजी रात्री ९ ते पहाटे ६ वाजेपर्यंत श्री श्री १००८ गोपाळगिरी महाराज (दत्तबर्डी, हदगाव) यांच्या हस्ते व सर्व संतांच्या उपस्थितीत भव्य महापूजा संपन्न होणार आहे. सोमवार, दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी माहूरगड येथून सकाळी दिंडी परतीच्या प्रवासासाठी उस्माननगरकडे निघणार आहे.

या दिंडीचे आयोजन व व्यवस्थापन संत अवधूतबन गुरु शंकरबन महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून, ज्येष्ठ पताका प्रमुख द. भ. प. पुरभाजी देवराव पाटील घोरबांड हे असणार आहेत. दररोज मुक्कामाच्या ठिकाणी गुरुवर्यांचे प्रवचन व आशीर्वचन भाविकांना लाभणार आहे. तरी या भक्तीमय पायी दिंडी सोहळ्यात अधिकाधिक भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन दिंडी आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

