नांदेड| श्रीक्षेत्र माळेगांव यात्रा येथे कृषि विभाग जिल्हा परिषद नांदेडमार्फत भव्य कृषिप्रदर्शन, फळे, भाजीपाला व मसाला पिके प्रदर्शन व स्पर्धा तसेच सन 2025-26 यावर्षामध्ये कृषिक्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे सन 2025-26 चे 16 शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार कृषिनिष्ठ शेतकरी म्हणून साडीचोळी, शॉल, फेटा, मोमेन्टो देऊन करण्यात येणार आहे, असे जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.


यावर्षी कृषि विभाग, जिल्हा परिषद नांदेडमार्फत यात्रेच्या ठिकाणी कृषि प्रदर्शनचे आयोजन केले असून बियाणे, रासायनिक खते, किटकनाशक औषधी, विविध कृषि औजारे, ट्रॅक्टर, यंत्रे, सुक्ष्मसिंचन, कृषि विज्ञान केंद्रामार्फत मातीपरिक्षण प्रयोगशाळा, कृषि विद्यापीठ, कृषि विभाग महाराष्ट्र शासन, सेंद्रीय शेती, देशीवाण, किटकनाशके वापराबाबत मार्गदर्शन इत्यादीबाबतचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत.


यामध्ये बियाणे कंपन्याकडून विविध पिकांचे लाईव्ह सॅम्पल ठेवण्यात येणार आहेत. यात्रेचा कालावधी दिनांक 18 ते 22 डिसेंबर 2025 असणार आहे. 18 डिसेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते कृषिप्रदर्शनाचे उद्घाटन होऊन कृषि निष्ठ पुरस्काराचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. स्टॉल सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सुरू राहतील. यादरम्यान बहुतांश यात्रेकरू व शेतकरी स्टॉलला मोठया प्रमाणात भेटी देतात. उत्पादनाची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याची व सुधारीत तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसिध्दी करण्याची चांगली संधी याप्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.


जिल्हा परिषदमार्फत यात्रेच्या ठिकाणी कृषिप्रदर्शनचे आयोजन केले असून बियाणे, रासायनिक खते, किटकनाशक औषधी, विविध कृषि औजारे, ट्रॅक्टर, यंत्रे, सुक्ष्मसिंचन, कृषि विज्ञान केंद्रामार्फत माती परिक्षण प्रयोगशाळा, कृषि विद्यापीठ, कृषि विभाग महाराष्ट्र शासन, सेंद्रीय शेती, देशीवाण, किटकनाशके स्टॉल उभारण्यात येणार आहेत. सर्व कंपनी प्रतिनिधीनि आपला अर्ज कृषी विभाग जिल्हा परिषद नांदेड कार्यालयात 7 डिसेंबर 2025 पर्यंत सादर करावा.

यात्रेत कृषि विभाग जिल्हा परिषद नांदेडमार्फत जिल्हास्तरीय फळे, मसाला पिके व भाजीपाला प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच फळे, मसाला पिके व भाजीपाला प्रदर्शनाचा स्टॉल उभारण्यात येतो. या प्रदर्शनात जिल्हयातील फळे व भाजीपाला घेणारे शेतकऱ्यांनी आपले शेतातील भाजीपाला व फळे पिकांचे उत्कृष्ट नमुने आणावेत. प्रदर्शनात ठेवलेल्या फळे, मसाला पिके व भाजीपाल्यांच्या नमुन्यातून प्रत्येक वाणातुन उत्कृष्ट नमुन्यास प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात येईल व विजेत्या शेतकऱ्यांना रोख बक्षिस व प्रमाणपत्र देण्यात येईल.
श्रीक्षेत्र माळेगांव यात्रेत कृषिविभागामार्फत जिल्हास्तरीय फळे, भाजीपाला व मसाला पिकेस्पर्धा आयोजित करण्यात येणार असून त्यात प्रथम, द्वितीय व त्रितीय पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना अनुक्रमे 4 हजार 3 हजार व 2 हजार रुपये याप्रमाणे बक्षीस देण्याचे नियोजन आहे. दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी मान्यवरांच्या हस्ते कृषि प्रदर्शनात भाग घेतलेल्या विविध कंपन्यापैकी प्रथम, द्वितीय व तृतीय असे क्रमांक प्राप्त करणाऱ्या कंपन्यांचा प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात येणार आहे, असे कृषी विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.


