नांदेड| गत काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शहरातील श्रीनगर भागातील रस्त्यावर एक झाड या ठिकाणाहून जाणाऱ्या दुचाकीवर कोसळले आहे. या दुर्घटनेत दुचाकीवरील १० वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आणि आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. हि घटना रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. यश गुप्ता वय १० असे मयत बालकाचे नाव आहे. घटना घडताच नागरिकांनी धाव घेऊन दुचाकीवर पडलेले झाड उचलून जखमींना बाहेर काढले असून, जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गत काही दिवसांपासून नांदेड शहर व परिसरात जोरदार पाऊस सुरुच आहे. नदी-नाले हीदुथडी भरून वाहत आहेत. शहरातील अनेक भागात रस्त्यांवर पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणची जुनी झाडे जीर्ण होऊ लागली आहेत. शहरातील बाबानगर भागातील पाणीपुरीचा व्यवसाय करणारे पंकज गुप्ता हे पत्नी पुजा आणि मुलगा यश वय १० वर्ष यांच्यासह दुचाकीवर जात होते.
नांदेड शहरातील श्रीनगरच्या मुख्य रस्त्यावर वाहतूक सुरू असताना, पावसामुळे मुळापासून एक झाड उखडले आणि नेमके त्यांच्या दुचाकीवरच कोसळले. ही घटना रविवारी दि.२८ रोज दुपारी १२ च्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच भाग्यनगरचे पोलिस निरीक्षक रामदास शेंडगे तसेच मनपाचे अग्निशमन अधिकारी के डी.दासरे, आर.एम.गायकवाड, साजीद, मोरे, ताटे, गिते, लांडगे, खेडकर यांनी धाव घेत मदत कार्य सुरू केले. घटनेत जखमी पंकज व पूजा यांना येथील नागरिकांच्या मदतीने बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान गंभीर जखमी झालेल्या यशचा मृत्यू झाल्याची माहिती भाग्यनगरचे पोलिस निरीक्षक रामदास शेंडगे यांनी दिली.
मूळचे राजस्थानचे असणारे गुप्ता कुटुंबीय २० वर्षांपासून नांदेड शहरात पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करतात. रविवार असल्याने ते खरेदीसाठी बाहेर पडले होते. घरी परत येताना ही दुर्घटना घडली. त्यात गुप्ता यांचा एकुलता एक मुलगा यशचा मृत्यू झाला.