अ. ईश्वर आणि गुरु एकच आहेत : गुरु म्हणजे ईश्वराचे साकार रूप व ईश्वर म्हणजे गुरूंचे निराकार रूप.
१. अधिकोषाच्या बर्याच शाखा असतात. त्यांपैकी स्थानिक शाखेत खाते उघडून पैसे भरले तरी चालते. तसे करणे सोपेही असते. दूरच्या मुख्य कार्यालयातच जाऊन पैसे भरले पाहिजेत, असे नसते. तसे करण्याचा त्रास घेण्याचीही आवश्यकता नसते. तसेच भाव-भक्ति, सेवा, त्याग वगैरे न दिसणार्या ईश्वरासाठी करण्यापेक्षा त्याच्या सगुणरूपाच्या म्हणजे गुरूंच्या संदर्भात केल्यास ते सोपे जाते. स्थानिक शाखेत भरलेले पैसे जसे अधिकोषाच्या मुख्यालयातच जमा होतात, तसे गुरूंची सेवा केली की ती ईश्वरालाच पोहोचते.

२. वामनपंडितांनी भारतभर फिरून मोठमोठ्या विद्वानांचा पराभव केला आणि त्यांच्याकडून पराजयपत्रे लिहून घेतली. ती विजयपत्रे घेऊन जात असतांना एका संध्याकाळी ते एका झाडाखाली संध्या करायला बसले. तेव्हा त्यांना फांदीवर एक ब्रह्मराक्षस बसलेला दिसला. तेवढ्यात दुसरा एक ब्रह्मराक्षस बाजूच्या फांदीवर येऊन बसायला लागला, तेव्हा पहिला त्याला येऊ देईना आणि म्हणाला, ‘‘ही जागा वामनपंडितासाठी आहे; कारण त्याला आपल्या विजयाचा फार अहंकार झाला आहे.’’ हे ऐकताक्षणीच वामनपंडितांनी सर्व विजयपत्रे फाडली आणि ते हिमालयात तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले. बरीच वर्षे तपश्चर्या केल्यावरही देव दर्शन देईना; म्हणून निराशेने त्यांनी कड्यावरून खाली उडी मारली. तेवढ्यात ईश्वराने त्यांना झेलले आणि डोक्यावर डावा हात ठेवून आशीर्वाद दिला. त्यानंतर पुढील संभाषण झाले.

पंडित : डोक्यावर डावा हात का ठेवला, उजवा का नाही ?
ईश्वर : तो अधिकार गुरूंचा आहे.
पंडित : गुरु कोठे भेटतील ?
ईश्वर : सज्जनगडावर.
त्यानंतर वामनपंडित सज्जनगडावर समर्थ रामदासस्वामींच्या दर्शनाला गेले. समर्थांनी त्यांच्या पाठीवर उजवा हात ठेवून आशीर्वाद दिला.


पंडित : डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद का नाही दिला ?
स्वामी : अरे, ईश्वराने हात ठेवलेला आहेच की!
पंडित : मग ईश्वराने ‘डोक्यावर हात ठेवायचा अधिकार गुरूंचा’, असे का म्हटले ?
स्वामी : ईश्वराचा उजवा आणि डावा हातही एकच आहे, ईश्वर अन् गुरु एकच आहेत, हे कसे कळत नाही तुला!

गुरूंचे प्रकार
१. कार्यपद्धतीनुसार प्रकार : ‘वैद्य तीन प्रकारचे असतात – उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. जो वैद्य नाडी पाहून ‘औषध घे’ असे फर्मावून निघून जातो आणि रोगी औषध घेतो किंवा नाही याची काही विचारपूस करत नाही, तो कनिष्ठ वैद्य. जो वैद्य रोगी औषध घेत नाही हे पाहून ‘औषध घेतल्यास तू बरा होशील’, असे नानाप्रकारे गोड गोड बोलून त्याला समजावतो, तो झाला मध्यम वैद्य आणि जो वैद्य रोगी काही केल्या औषध घेतच नाही असे पाहून, त्याच्या छातीवर गुडघा रोवून त्याला जबरदस्तीने औषध घ्यायला लावतो, त्याला म्हणावे उत्तम वैद्य. त्याचप्रमाणे जे गुरु वा आचार्य उपदेश दिल्यानंतर शिष्यांची काही विचारपूस करत नाहीत ते आचार्य किंवा गुरु कनिष्ठ होत. शिष्यांना उपदेश ग्रहण करता यावा, त्यांचे कल्याण व्हावे, म्हणून पुनःपुन्हा त्यांना समजावून सांगतात अन् त्यांच्यावर प्रेम करतात ते मध्यम गुरु; परंतु शिष्य नीट अवधान देत नाहीत किंवा अनुरूप आचरण करत नाहीत हे पाहून जे आचार्य प्रसंगी जोरजबरदस्तीने का होईना, त्यांना तसे करायला लावतात, तेच उत्तम आचार्य होत.’ अर्थात् ही जोरजबरदस्ती स्थूल माध्यमातून नव्हे, तर सूक्ष्मातून केली जाते; म्हणून सर्वसाधारण व्यक्तीच्या लक्षात येत नाही.
२. अंतर्गुरु आणि बाह्यगुरु : ‘अंतर्गुरु आणि बाह्यगुरु यांच्यात फारसा भेद नसतो. तुम्ही बाह्यगुरूची करत असलेली पूजा वास्तविक तुमच्या हृदयस्थ गुरूलाच पोहचत असते. परमात्म्याला तुम्ही आपले हृदय अर्पण करता; त्याच्यासाठी म्हणून तुम्ही जे काही करता, त्यापासून तुमच्या अंतर्यामी तुमचाच लाभ होतो. सहस्रदल-मंडलातील त्रिकोणात अंतर्गुरूचा वास असतो, असे गुरुगीतेतही सांगितले आहे –
‘‘अकठादित्रिरेखाब्जे-सहस्रदल मण्डले ।
हंसपाश्र्वत्रिकोणे च स्मरेत्तन्मध्यगं गुरुम् ।। ५८ ।।’’
हा अंतर्गुरु सहस्रसूर्यासमान तेजःपुंज असतो; भेद इतकाच की, बाह्य सूर्यप्रकाशामुळे उष्णता निर्माण होते; पण अंतर्गुरूचा प्रकाश शीतल असतो. ध्यानाच्या उच्च अवस्था प्राप्त करून घेणार्या प्रत्येकाला अंतर्गुरूचे दर्शन होते. सहस्रदलातील दिव्य प्रकाशात सतत चमचमणार्या नीलबिंदूच्या रूपाने गुरु वास करत असतात. तुम्हाला तुमच्या अंतर्यामी वास करणार्या गुरूकडून सत्य काय आहे, ते समजले म्हणजे ज्याचे तुम्ही आजवर पूजन करत आलात तो बाह्यगुरु अंतर्गुरूहून भिन्न नसल्याची प्रचीति तुम्हाला येईल.’ एकदा तुमची अंतर्शक्ति जागृत झाली की, मग ती स्वतःच गुरुकृपा बनून तुम्हांला मार्गदर्शन करू लागते. अगदी पूर्णत्व प्राप्त होईपर्यंत ती अंतर्शक्तिच तुम्हांला मार्गदर्शन करत राहते. ‘आपण पूर्ण आहोत आणि यापूर्वीही सतत पूर्णच होतो’, याची जाणीव तुम्हांला शेवटी होते.

