नांदेड| नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील होनवडज येथील रहिवासी आणि आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधव यांची जपानमधील आयची-नागोया येथे होणाऱ्या एशियन पॅरा गेम्स २०२६ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून त्यांची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. ही निवड नांदेड जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.


भाग्यश्री जाधव यांनी २०१७ पासून आपल्या क्रीडा कारकिर्दीला सुरुवात केली. गेल्या नऊ वर्षांत त्यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध दिव्यांग क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल २५ सुवर्ण, ४ रौप्य आणि ७ कांस्य अशी एकूण ३६ पदके पटकावली आहेत. आतापर्यंत त्यांनी दहा देशांमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय व जागतिक स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला आहे.


सन २०२१ मध्ये टोकियो आणि २०२४ मध्ये पॅरिस येथे झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेतही त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. विशेष म्हणजे पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय संघाचा ध्वजवाहक होण्याचा बहुमान भाग्यश्री जाधव यांना मिळाला होता.




त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित केले आहे. तसेच त्यांची मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी, वर्ग-१ या पदावर नियुक्ती करण्यात आली असून त्या पुणे येथे कार्यरत आहेत.
जपानमधील आयची-नागोया येथे १८ ते २५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत एशियन पॅरा गेम्स स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेसाठी भाग्यश्री जाधव यांची दुसऱ्यांदा निवड झाली आहे. यापूर्वीही त्यांनी एशियन पॅरा गेम्समध्ये सहभाग घेतला होता.
आपल्या निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना भाग्यश्री जाधव म्हणाल्या की, मुख्य प्रशिक्षक सी. सत्यनारायण, सहप्रशिक्षिका पुष्पा मॅडम, प्रशिक्षक प्रशांत वाघ, गुरुबंधू पत्रकार प्रकाश कांबळे, सेवानिवृत्त जिल्हा नियोजन अधिकारी रामदास पाटील सुमठाणकर, प्रसिद्ध व्यापारी शशिकांत पाटील जुन्नेबेळीकर यांच्यासह डॉक्टर मंडळी आणि माध्यम क्षेत्रातील हितचिंतकांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन, प्रेरणा व सहकार्य यामुळेच एशियन पॅरा गेम्समध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.
भाग्यश्री जाधव यांच्या या निवडीबद्दल नांदेड जिल्ह्यासह राज्यातील क्रीडा, सामाजिक व विविध क्षेत्रांतून त्यांचे अभिनंदन होत असून, जपानमधील स्पर्धेत त्या भारतासाठी पदक मिळवून नांदेडचा नावलौकिक वाढवतील, अशा शुभेच्छा व्यक्त होत आहेत.

