हिमायतनगर, अनिल मादसवार| वाढदिवस म्हटला की केक, फटाके, हार-तुरे आणि अनाठायी खर्च करण्याची प्रथा वाढत असताना, शेतकरी पुत्र तथा सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे यांनी मात्र वाढदिवसाचा खर्च टाळून सामाजिक व धार्मिक उपक्रमाला प्राधान्य दिले आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी वरद विनायक मंदिराची रंगरंगोटी करून देत मंदिराच्या सुशोभीकरणात मोलाचा हातभार लावला. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.



हिमायतनगर तालुक्यात यंदा पावसाने काही प्रमाणात साथ दिली असली, तरी पावसातील खंड आणि जमिनीत अपेक्षित प्रमाणात पाणी न मुरल्याने शेतकरी चिंतेत आहेत. सध्या पिके हिरवीगार व समाधानकारक दिसत असली तरी आगामी काळात पावसाची साथ न मिळाल्यास उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर भूजलपातळी पुरेशी वाढली नसल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



हीच परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून ज्ञानेश्वर शिंदे यांनी वाढदिवसाच्या दिवशी ग्रामदैवत श्री परमेश्वर मंदिरात तसेच वरद विनायक गणपती मंदिरात मनोभावे दर्शन घेतले. हिमायतनगर तालुक्यावर वरुणराजाची कृपादृष्टी कायम राहावी, शेतकऱ्यांची पिके जोमाने वाढून उत्पादन भरघोस यावे, शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटांपासून दिलासा मिळावा आणि सर्वसामान्यांच्या घरात सुख-समृद्धीसह धन-धान्याची भरभराट व्हावी, अशी प्रार्थना त्यांनी केली.




“वाढदिवसाचा खर्च स्वतःच्या आनंदासाठी करण्यापेक्षा देवस्थानाच्या उपयोगी कामासाठी केला तर त्यातून मिळणारे समाधान अधिक मोठे आहे,” या भावनेतून वरद विनायक मंदिराची रंगरंगोटी करून दिल्याचे ज्ञानेश्वर शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, वरद विनायक मंदिराची देखभाल करणारे भास्कर मामा चिंतावार यांनी ज्ञानेश्वर शिंदे यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले. मंदिराची रंगरंगोटी करून दिल्याबद्दल त्यांनी शिंदे यांचे अभिनंदन करत, वाढदिवसाचा खर्च टाळून धार्मिक स्थळाच्या सुशोभीकरणासाठी केलेला हा उपक्रम निश्चितच अनुकरणीय असल्याचे सांगितले.

वाढदिवसाच्या निमित्ताने दिखावा आणि अनाठायी खर्च करण्याऐवजी देवस्थानाचे सुशोभीकरण, शेतकऱ्यांसाठी प्रार्थना आणि समाजाच्या कल्याणाची भावना जपणाऱ्या ज्ञानेश्वर शिंदे यांच्या या उपक्रमाची तालुक्यात चर्चा होत आहे. आता शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले असून, वरुणराजाने दमदार हजेरी लावून पिकांसह पिण्याच्या पाण्याची चिंता दूर करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

