Homeमहाराष्ट्रPandharpur : पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून...

Pandharpur : पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा

पंढरपूर| आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी बाबासाहेब माधव माने व प्रभावती बाबासाहेब माने या दाम्पत्यासमवेत श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यावेळी पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता सर्वांचे योग्य पुनर्वसन करून येत्या अडीच वर्षांत पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

वाढत्या भाविकसंख्येच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी पंढरपूर कॉरिडॉरची उभारणी करण्यात येणार आहे. कॉरिडॉरमुळे व्यावसायिकांचा व्यवसाय वाढण्यास मदत होईल, नागरिकांना घरे उपलब्ध होतील आणि भाडेकरूंचीही योग्य व्यवस्था केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यंदाच्या वारीत दर्शनासाठी २५ किलोमीटरपेक्षा अधिक लांब रांग लागली होती. लाखो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने विठ्ठलाचे दर्शन घेतले. चंद्रभागा नदीचे पाणी स्वच्छ ठेवण्यासह वाळवंट परिसरात स्वच्छता व भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाचे कौतुक केले.

शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार, उद्योजक अशा सर्व घटकांचा वारकरी संप्रदायात समावेश आहे. वारकऱ्यांची आणि शेतकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा असल्याचे सांगत, शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी राज्य शासनाने ५६ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी, मोफत वीज आणि थकीत वीजबिले माफ करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर, अमृता फडणवीस, आमदार समाधान आवताडे, राजेंद्र राऊत, सुरेश खाडे यांच्यासह जिल्हा प्रशासन व मंदिर समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

मानाच्या वारकरी दाम्पत्याचा सन्मान – शासकीय महापूजेचे मानाचे वारकरी बाबासाहेब माधव माने आणि प्रभावती माने या दाम्पत्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. एसटी महामंडळाकडून त्यांना वर्षभरासाठी मोफत प्रवासाचा पासही देण्यात आला.

‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कार – पाणी, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, प्लास्टिकमुक्त वारी आणि वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती करणाऱ्या दिंड्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रथम क्रमांक श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थान, कौंडण्यपूर; द्वितीय क्रमांक वारकरी धर्मसंकीर्तन सेवा प्रतिष्ठान, जालना; तर तृतीय क्रमांक गोऱ्हेकर संस्था, आळंदी देवाची यांना पुरस्कार व धनादेश देऊन गौरविण्यात आले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments