
भोकर/हिमायतनगर / नांदेड| नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी धडक कारवाई करत हिमायतनगर तालुक्यातील एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत जुगार साहित्य तसेच अवैध वाळू वाहतुकीसह एकूण ३२ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, १४ मार्च २०२६ रोजी हिमायतनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हिमायतनगर परिसरातील गंगाराम दंडेवाड यांच्या शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने ही कारवाई केली. या छाप्यात जुगार खेळणाऱ्या काही जणांना ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळावरून पोलिसांनी २७ हजार रुपये रोख रक्कम, चार मोबाईल फोन आणि तीन मोटारसायकली असा सुमारे १ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याचवेळी दुसऱ्या कारवाईत भोकर तालुक्यतील रिठा येथे अवैध वाळू वाहतुकीविरोधातही मोठी कारवाई करण्यात आली. २५ ब्रास रेतीने भरलेले पाच हायवा पोलिसांनी जप्त केले असून या वाहनांची अंदाजे किंमत ३० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. दोन्ही कारवायांमध्ये मिळून एकूण ३२ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


दरम्यान, नांदेड परिक्षेत्रात १६ मार्च ते ३० मार्च या कालावधीत गुन्हेगारीविरोधी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिली. या मोहिमेदरम्यान अवैध दारू, जुगार, गुटखा, पान मसाला, अवैध वाळू वाहतूक अशा बेकायदेशीर व्यवसायांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

अवैध व्यवसायांची माहिती देण्यासाठी पोलिसांनी “खबर” हेल्पलाईन (९१ ५० १०० १००) सुरू केली असून नागरिकांनी गोपनीयपणे माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
नुकतेच पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी हिमायतनगर पोलिस ठाण्याची तपासणी केली होती. त्यांच्या दौऱ्यानंतर दुसऱ्याच दिवशी आंदेगाव (पूर्व) येथे गावकऱ्यांनी अवैध देशी दारू विक्री करणाऱ्यांवर धाड टाकून आरोपींना पकडत पोलिसांच्या स्वाधीन केले होते.
तथापि, हिमायतनगर शहर व तालुक्यात चोरी, व्याजी दिडी, अवैध देशी-विदेशी दारू विक्री, जुगार अड्डे, अवैध रेती-मुरूम वाहतूक, मटका, गुटखा तसेच रेशनचा काळाबाजार असे प्रकार अद्याप सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत.
या सर्व बेकायदेशीर धंद्यांवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने सातत्यपूर्ण व ठोस कारवाई करावी. तसेच अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या काही अधिकारी-कर्मचाऱ्यांची बदली करून कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणीही नागरिकांकडून केली जात आहे.



