Himaytnagar news : लातूर नवोदय विद्यालयातील चिमुकलीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी हिमायतनगरात सोमवारी रास्ता रोको आंदोलण

IMG 20260110 133055 Himaytnagar news : लातूर नवोदय विद्यालयातील चिमुकलीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी हिमायतनगरात सोमवारी रास्ता रोको आंदोलण

हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| लातूर नवोदय विद्यालयातील चिमुकलीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र एसआयटीमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अन्यथा मातंग समाज तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड–किनवट राष्ट्रीय महामार्गावरील चौकात सोमवार, दि. १२ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ठीक १२ वाजता भव्य बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

लातूर जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीत शिक्षण घेणाऱ्या मातंग समाजाच्या हुशार विद्यार्थिनी कुमारी अनुष्का हिचा मृत्यू आत्महत्या नसून घातपात असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. विद्यालयातील वसतिगृहात पलंगाला लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. मात्र हा मृत्यू अभ्यासाच्या तणावामुळे झाला की नियोजनबद्ध घातपात आहे, याबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतेही स्पष्ट व लेखी उत्तर देण्यात आलेले नाही.

या प्रकरणात अनुष्काच्या आई-वडिलांसह विविध सामाजिक संघटनांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून, नवोदय विद्यालयातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी करण्यात यावी व दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळावा, विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेकडे व मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कठोर उपाययोजना राबवाव्यात, अशीही मागणी करण्यात आली.

या प्रकरणाची स्वतंत्र एसआयटीमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अन्यथा मातंग समाज तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड–किनवट राष्ट्रीय महामार्गावरील चौकात सोमवार, दि. १२ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ठीक १२ वाजता भव्य बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे असे निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी लहुजी शक्ती सेना हिमायतनगर तालुकाध्यक्ष राजुभाऊ गायकवाड, लोकस्वराज्य आंदोलनाचे मराठवाडा कार्याध्यक्ष धोंडोपंत बनसोडे, ज्येष्ठ पत्रकार दिलीप शिंदे, ज्ञानेश्वर पंदलवाड, पत्रकार धम्मपाल मुनेश्वर, आनंद जळपते, सदानंद पतंगे, देवानंद गुंडेकर, राम चिंतलवाड, शुद्धोधन हनवते, यादव येणेकर, माधव कांबळे, प्रशांत राहुलवाड, मारोती गाडेकर, निलेश चटणे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. या भव्य बेमुदत रास्ता रोको आंदोलनात तालुक्यातील हजारो समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सकल मातंग समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top