नांदेड, अनिल मादसवार| अन्नदाता उत्सव अंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय व्यवसाय कार्यालय नांदेड यांच्या वतीने कृषी व अन्न प्रक्रिया ग्राहक मेळावा नांदेड येथील हॉटेल विसावा येथे दि. 22 डिसेंबर रोजी यशस्वीरीत्या पार पडला. या मेळाव्यास सुमारे 200 हून अधिक शेतकरी व उद्योजकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात अन्नदात्यांच्या आत्मीय स्वागताने करण्यात आली.


कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात क्षेत्रीय प्रबंधक श्री. सूरज यामयार यांनी अन्नदाता उत्सव आयोजित करण्यामागील बँकेची भूमिका व उद्दिष्टे स्पष्ट केली. यानंतर उप महाप्रबंधक श्री. वाय. व्ही. एस. एस. नागेश्वर राव यांनी ग्रामीण विकासामधील भारतीय स्टेट बँकेची भूमिका अधोरेखित करत, शेतकऱ्यांनी आर्थिक स्थैर्यासाठी भारतीय स्टेट बँकेसोबत जोडले जावे, असे आवाहन केले. नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक श्री. दिलीप दमयावर यांनी नाबार्डच्या विविध अनुदान योजना तसेच उच्च मूल्य प्रस्तावांमध्ये बँकेची भूमिका याबाबत सविस्तर माहिती दिली.

कृषी विभाग, नांदेड येथील स्मार्ट प्रकल्प संचालक श्री. अनिल शिरफुले यांनी शासकीय कृषी योजनांची माहिती देत पात्रता, लाभ व भारतीय स्टेट बँकेमार्फत कर्ज संलग्नतेचे महत्त्व स्पष्ट केले. सिबिलचे असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट श्री. दिलावर खान यांनी बँक वित्तपुरवठ्या मध्ये सिबिल स्कोअरचे महत्त्व आणि तो कसा सुधारता येईल, याची माहिती दिली.


प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेबाबत श्री. नंदकिशोर नैनवाड व प्रकल्प सल्लागार श्री. मन्मत बिरादार यांनी योजना व अनुदान प्रक्रियेची माहिती देऊन शेतकऱ्यांना एसबीआयकडे दर्जेदार प्रकल्प सादर करण्याचे आवाहन केले. एसीएबीसी व नाबार्ड अनुदान योजनांची माहिती मॅनेज, नागपूर येथील सल्लागार श्री. अश्विनकुमार यांनी दिली.

तसेच ॲग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड, प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया उद्योग योजना, ॲनिमल हसबंडरी इन्फ्रास्ट्रक्चर फंड, ॲग्री फूड अँड एंटरप्राइज लोन व किसान समृद्धी ऋण योजना यावर श्री. सुनील साहेब व श्री. किरण चांदोरकर यांनी सविस्तर सादरीकरण केले.
या प्रसंगी महिला उद्योजिका, प्रगत फार्मर प्रोड्यूसर कंपनी व प्रगत शेतकरी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
परिसंवाद सत्रात हदगाव (नांदेड) येथील एका प्रगत शेतकऱ्याने भारतीय स्टेट बँकेकडून मिळालेल्या वेळेवर बँकिंग सहाय्यामुळे झालेल्या प्रगतीची यशोगाथा मांडली.
शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन मुख्य प्रबंधक श्री. सय्यद मुशीर, श्री. सुनील घुगुळ, श्री. भानू लांका व रिलेशनशिप मॅनेजर श्री. अरविंद चव्हाण यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शिल्पा जिंतुरकर यांनी केले, तर एफ.एस.टी.ओ. श्री. किरण चांदोरकर (विभागीय प्रशासकीय कार्यालय, नांदेड) यांनी आभारप्रदर्शन करून समारोप केला.
मेळाव्यात निर्माण झालेल्या लीड्स तातडीने व्यवसायात रूपांतरित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाणार असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले.

