हिमायतनगर, अनिल मादसवार | आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापू लागले आहे. निवडणूक आचारसंहिता व तारीख जाहीर होण्याच्या उंबरठ्यावर असताना शहरात विविध स्वयंघोषित “भावी उमेदवारांची” लगबग वाढली असून, जनतेची सेवा करण्याच्या नावाखाली केवळ प्रसिद्धीसाठी आणि सत्तेच्या हव्यासापोटी हालचाली सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.


गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर “मीच शहराचा विकास करू शकतो” अशी हौसेने केलेली पोस्टांची रेलचेल सुरू असून, २५ ते 30 वर्षे वयाच्या तरुणांपासून ते मागील १५ वर्षांपासून “राजकारणात सक्रिय” असल्याचा दावा करणारे अनेक जण जनतेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, प्रत्यक्षात कोणालाही पक्षाचे तिकीट मिळेल याची खात्री नसतानाही “मीच पुढचा लोकनायक” असा आव आणून दिशाभूल केली जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.


शहराच्या विकासाच्या नावाखाली केवळ वैयक्तिक स्वार्थ आणि सत्तेची लालसा जोपासण्याचा हेतू या “भावी नेत्यांच्या” हालचालींमधून स्पष्ट होत आहे. जनतेचा विश्वास मिळविण्यासाठी विविध कार्यक्रम, पोस्टरबाजी, सोशल मीडियावरील आकर्षक घोषणा या माध्यमातून वातावरण निर्मिती केली जात असली तरी त्यामागे केवळ ‘सत्ता आणि पैसा’ हाच प्रमुख उद्देश असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.


शहरातील सुजाण नागरिकांनी अशा दिखाऊ आणि बोलबच्चन नेत्यांपासून सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण, खरी जनसेवा ही अपेक्षेशिवाय आणि तळमळीने जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होण्यात असते. मागील अनेक वर्षांपासून गोर-गरीब, शेतकरी, महिला, युवा यांच्या अडीअडचणीत निस्वार्थपणे काम करणाऱ्यांची पारख करूनच मतदान करण्याची वेळ आता आली आहे.

नाहीतर, “ये रे माझ्या मागल्या” म्हणत पुन्हा फसवले गेल्याची खंत व्यक्त करण्याची वेळ जनतेवर ओढवेल, असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे.


