देगलूर, गंगाधर मठवाले| ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे देगलूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. खरीप हंगामातील पिकांसह शेतातील मातीसुद्धा वाहून गेली. शेतकऱ्यांच्या आक्रोशानंतर शासनाने मदत निधी जाहीर केला असला तरी हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही नुकसानभरपाई जमा झालेली नाही.


या अन्यायाविरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने देगलूर तहसील कार्यालयासमोर “चटणी-भाकर आंदोलन” करण्यात आले. शेतकऱ्यांची “काळी दिवाळी” साजरी करून शासनाच्या निष्क्रिय धोरणांचा निषेध व्यक्त करण्यात आला.


हे आंदोलन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ, नेते अमित देशमुख, आणि खासदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, तर प्रदेश सचिव व देगलूर-बिलोली विधानसभा निरीक्षक डॉ. दिनेश नवगिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.


आंदोलनाचे प्रास्ताविक करताना काँग्रेस जिल्हा प्रवक्ते कैलास येसगे (कावळगावकर) यांनी देगलूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान, मिळालेली तुटपुंजी मदत आणि शेतकऱ्यांच्या भावना यांचे अचूक वर्णन केले. तालुकाध्यक्ष श्वेताताई बसवराज पाटील यांनी राज्य सरकारच्या शेतीविरोधी धोरणांवर कठोर टीका केली.

डॉ. दिनेश नवगिरे म्हणाले, “राज्य आणि केंद्रातील सध्याचे सरकार हे शेतकरी व गोरगरिबांच्या विरोधात काम करणारे सरकार आहे. नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाला असून काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे.” आंदोलनापूर्वी पक्ष निरीक्षकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनांची आढावा बैठकही घेतली.

या वेळी काँग्रेस किसान आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष रामानंद जाधव, शहराध्यक्ष व माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार, निवृत्ती कांबळे सांगवीकर, अविनाश निलमवार, शरीफ मामू, बालाजी थडके, सुभाष अल्लापुरकर, प्रा. उत्तमकुमार कांबळे, सय्यद सर, प्रा. सिकंदर देसाई, शेख मीरामोईद्दीन, नंदाताई देशमुख, आम्रपाली येसगे, व्यंकट पाटील झरीकर, दिलीप बंदखडके, डॉ. धुमाळे, सतीश पाटील, राजू जाधव, डॉ. मिलिंद शिकारे, अँड. अशोक कापसे, विष्णू पाटील, जीवन पाटील, अजय वानखेडे, माधव पाटील शेळगावकर, मलरेड्डी यालावार, मनोहर देगावकर, हाफिजखान पठाण, शेषेराव येलबुगडे, प्रकाश काळे, अँड. अंकुश जाधव, शंकर जाधव हळीकर यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.


